प्रशांत चंदनखेडे वणी :-
नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची साडेसात लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार चिखलगाव परिसरातील महादेव नगरी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेंद्र दादाजी बोबडे (वय ६२, रा. महादेव नगरी, चिखलगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेंद्र आस्कर (वय ६२, रा. घोन्सा, सध्या मेघदूत कॉलनी, चिखलगाव) व सचिन सुरेश गारघाटे (वय अंदाजे ५१, रा. अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर) या दोघांनी फिर्यादीला विश्वासात घेत त्यांना तब्बल ७.३० लाखांनी गंडविले.
फिर्यादीने पोलीस स्टेशनला नोंदविलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांच्या मुलाला नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून एकूण ७ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नोकरी न लावता आरोपींनी त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
ही घटना २८ ऑगस्ट २०२४ रोजी घडली असून याबाबत ८ एप्रिल २०२६ रोजी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुरेंद्र बोबडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरेंद्र आस्कर व सचिन गारघाटे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार निलकमल भोसले करीत आहेत.
या घटनेमुळे नोकरीच्या आमिषाला बळी पडणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

No comments: