एकीकडे गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागत असतांना, दुसरीकडे सिलेंडरचा काळाबाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार मारेगावात उघडकीस आला. प्रशासनाने केलेल्या धडक कारवाईत पिकअप वाहनातून सुरु असलेली गॅस सिलेंडरची अवैध विक्री उघड झाली असून, ४ लाख ३० हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २२ एप्रिलला दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास नवरगाव-कुंभा रोडवर करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून मारेगाव शहरात एचपी गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा जाणवत होता. ग्राहकांना तासन्तास रांगा लावूनही सिलेंडर मिळत नसताना, काही ठिकाणी ‘डोअर डिलिव्हरी’च्या नावाखाली सिलेंडरचा काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. ऑनलाईन बुकिंग करूनही प्रत्यक्षात सिलेंडर न मिळाल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी होती. गॅस सिलेंडरच्या सदोष वितरण प्रणालीबाबत ग्राहकांच्या तक्रारी वाढू लागल्याने प्रशासन अलर्ट मोडवर होतं.
याच पार्श्वभूमीवर तहसीलदार उत्तम निलावाड यांना करणवाडी–कुंभा रोडवर एचपी गॅस एजन्सीच्या पिकअप वाहनातून गॅस सिलेंडरची अवैध विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ प्रभारी पुरवठा निरीक्षक तथा नायब तहसीलदार विजय मत्ते यांना कारवाईचे आदेश दिले. तहसीलदारांच्या आदेशानंतर महसूल पथकाने घटनास्थळी धडक देत सापळा रचला आणि रस्त्यात वाहन उभे करून सिलेंडरची अवैध विक्री करणाऱ्या वाहन चालकाला रंगेहात पकडले.
कारवाई दरम्यान घटनास्थळावरून २० रिकामे सिलेंडर (३०,७४०), २० भरलेले सिलेंडर (५०,०००) आणि MH २९ BE २७३७ क्रमांकाचे पिकअप वाहन (३,५०,०००) असा एकूण ४,३०,७४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी प्रभारी पुरवठा निरिक्षक विजय मत्ते यांच्या फिर्यादीवरून एचपी गॅस एजन्सीचे संचालक धम्मपाल चोखाजी दारुंडे (४९, रा. मारेगाव) व वाहन चालक महेश हरिदास कावाडे (३२, रा. नवरगाव) यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शहरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शाम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
काळाबाजाराला चाप बसणार का?
प्रशासनाच्या या कारवाईनंतरही शहरात सुरू असलेल्या गॅस काळाबाजारावर पूर्णतः अंकुश बसेल का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नागरिकांनीही अशा प्रकारांविरोधात पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


No comments: