Latest News

Latest News
Loading...

मित्राकडूनच विश्वासघात! सावरकर चौकात हातोडीने जीवघेणा हल्ला; युवक गंभीर

प्रशांत चंदनखेडे वणी :-

मैत्रीच्या नात्यालाच काळीमा फासणारी धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे. किरकोळ वादातून मित्रानेच लोखंडी वस्तूने (हातोडी) सपासप वार करत ४५ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला अत्यवस्थ अवस्थेत चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

ही घटना १ मे रोजी सायंकाळी ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास सावरकर चौक परिसरात घडली. दिलीप नासरे (वय अंदाजे ४५ ते ५०, रा. सुभाषचंद्र बोस चौक, साक्षी बिछायत केंद्राच्या मागे) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप नासरे हे इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्तीचे काम करणारे कारागीर असून पूर्वी त्यांचे सुभाषचंद्र बोस चौकात दुकानही होते. मात्र काही वर्षांपूर्वी दुकान विकल्यानंतर ते ग्राहकांच्या ठिकाणी जाऊन काम करत होते.

दरम्यान, त्यांचा जवळचा मित्र असलेला संदीप साखरकर (वय अंदाजे ३० ते ३५, रा. सावरकर चौक) याच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या आरोपीने दिलीप यांना सावरकर चौक परिसरातील त्याच्या घराजवळ बोलावून घेतले. तेथे अचानक लोखंडी वस्तूने डोक्यावर वार करत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढविला.

या हल्ल्यात दिलीप नासरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. प्राथमिक उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, किरकोळ वादातून इतक्या टोकाच्या हिंसाचारापर्यंत पोहोचलेल्या या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:

Powered by Blogger.