प्रशांत चंदनखेडे वणी :-
महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत वणी शहरात आज (१ मे) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आयोजित या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात येणार आहे.
शहरातील टिळक चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे शिबीर पार पडणार आहे. या शिबिराचे उद्घाटन वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले हे राहतील.
यावेळी तहसीलदार निखिल धुळधर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवी, गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, तसेच विविध विभागांतील अधिकारी व मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
‘करा रक्तदान, वाचवा अनेकांचे प्राण’ आणि ‘८० टक्के समाजकारण’ या विचारांना उजाळा देत या शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. रक्ताची एक बाटली अनेकांसाठी जीवनदान ठरू शकते, या भावनेतून वणी तालुक्यातील युवक, विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे रक्तसाठा वाढण्यास मदत होणार असून, सामाजिक एकोप्याचा आदर्शही निर्माण होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

No comments: