प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील गोकुळनगर परिसरात (गॅस गोडाऊन) काही भंगार गोळा करणाऱ्यांकडून उघडपणे वायर, रबरी साहित्य व इतर भंगार वस्तू जाळून धूर प्रदूषण निर्माण केले जात असल्याने परिसरातील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. सततच्या धुरामुळे नागरिकांना श्वास घेणे कठीण होत असून, लहान मुले व नवजात बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही भंगार गोळा करणारे वायर जाळून त्यातील तांबे व इतर धातू वेगळे करून विक्री करतात. तसेच विविध रबरी व प्लास्टिक साहित्य जाळून त्यातून लोखंडी व अॅल्युमिनियमचे तुकडे वेगळे केले जातात. हा प्रकार रहिवासी वस्तीजवळच होत असल्याने जळत्या रबर व वायरमधून निघणारा काळाकुट्ट धूर थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे. परिणामी परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असून नागरिकांची दमछाक होत आहे.
विशेष म्हणजे या धुराचा सर्वाधिक फटका नवजात बालके, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना बसत आहे. अनेकांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ आणि घशात खवखव जाणवत असल्याचे नागरिकांनी सांगितले. “घरात बसणेही कठीण झाले आहे. दिवसभर धुराचे लोट घरात शिरतात,” अशी व्यथा स्थानिक महिलांनी व्यक्त केली.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधितांना भंगार साहित्य जाळण्यास मज्जाव केल्यास ते वाद घालण्यावर उतरतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाकडून मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या प्रकारावर नगर परिषद प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, संबंधितांवर दंडात्मक उपाययोजना कराव्यात आणि रहिवासी भागातील धूर प्रदूषण त्वरित थांबवावे, अशी जोरदार मागणी गोकुळनगर परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

No comments: