तालुक्यातील कुंभारखनी शेतशिवारात सोमवारी सायंकाळी निसर्गाच्या तडाख्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. शेतात जनावरे चारत असताना अचानक वीज कोसळल्याने सुरेखा सुधाकर चट्टे (वय ४०, रा. कुंभारखनी) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेखा चट्टे या मंगळवारी (२६ मे) सायंकाळच्या सुमारास आपले पती सुधाकर चट्टे यांच्यासोबत शेतात जनावरे चारण्यासाठी गेल्या होत्या. काही वेळानंतर सुधाकर हे घरी परतले, तर सुरेखा या जनावरांना चारा-पाणी करून घरी येणार असल्याचे सांगून शेतातच थांबल्या होत्या.
दरम्यान, अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. वातावरणात भीतीचे सावट निर्माण झाले असतानाच सुरेखा या जनावरे सांभाळत घराकडे निघाल्या. मात्र निसर्गाने अचानक घाला घातला आणि त्यांच्या अंगावर वीज कोसळली. विजेचा जोरदार तडाखा बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
बराच वेळ उलटूनही सुरेखा घरी न परतल्याने पती सुधाकर यांना काळजी वाटू लागली. ते तातडीने शेताकडे गेले असता, सुरेखा या शेतात निपचित अवस्थेत पडलेल्या दिसून आल्या. हा प्रकार पाहून सुधाकर यांना जबर धक्का बसला. त्यांनी तात्काळ कुटुंबीय व शेजाऱ्यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली.
यानंतर वणी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, वणी येथे पाठविला. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.
अचानक ओढवलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कुंभारखनी गावात हळहळ व्यक्त होत असून, चट्टे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


No comments: