प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात चोरट्यांनी चोरीच्या नवनवीन शक्कली लढवण्यास सुरुवात केली असून नागरिकांच्या मेहनतीच्या पैशांवर दिवसाढवळ्या डल्ला मारला जात आहे. गांधी चौकातील वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहरवासीयांची चिंता वाढवली आहे. अंगावर घाणसदृश्य पदार्थ फेकून एका व्यक्तीची मोटारसायकलला लटकवून असलेली पैशाची बॅग मोठ्या शिताफीने लंपास केल्याची चोरीची ही नवी पद्धत समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास लालगुडा येथील शंकर धोटे यांनी भारतीय स्टेट बँकेच्या वणी शाखेतून ५० हजार रुपयांची रोकड काढली. त्यांनी ती रक्कम एका छोट्या बॅगेत ठेवून बॅग मोटारसायकलच्या हॅण्डलला लटकवली होती. ते गांधी चौकातून मोटारसायकलने जात असताना अचानक त्यांच्या अंगावर कुणीतरी घाणसदृश्य पदार्थ फेकला. त्यामुळे ते गोंधळून गेले आणि एका दुकानाजवळ मोटारसायकल थांबवून शर्ट साफ करू लागले.
याच क्षणाची वाट पाहत असलेला एक चोरटा दबक्या पावलांनी मोटारसायकलजवळ पोहोचला आणि अत्यंत शिताफीने हॅण्डलला लटकवलेली पैशांची बॅग घेऊन पसार झाला. चोरीचा हा थरारक प्रकार काही सेकंदांतच घडला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा हा अगदी नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करताना स्पष्ट दिसत आहे.
या घटनेमागे नियोजनबद्ध टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बँकेतून पैसे काढल्यापासूनच चोरट्यांनी शंकर धोटे यांच्यावर पाळत ठेवली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. नागरिकांचे लक्ष विचलित करून चोरी करण्याची ही ‘डायव्हर्जन ट्रिक’ शहरात पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा असून या घटनेमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील गांधी चौक या वर्दळीच्या व मुख्य बाजारपेठेत भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांपुढेही मोठे आव्हान उभे राहिले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत.
नागरिकांनी सावध राहण्याची गरज
बँकेतून मोठी रक्कम काढल्यानंतर ती उघडपणे वाहनावर ठेवणे धोकादायक ठरत असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. चोरटे आता आधुनिक आणि चलाख पद्धतीने नागरिकांना लक्ष्य करत असल्याने सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


No comments: