Latest News

Latest News
Loading...

गौराळा शिवारात पोलिसांचा सापळा; गोवंश तस्करीचा पर्दाफाश


प्रशांत चंदनखेडे वणी 

गोवंश तस्करी आणि प्राण्यांच्या अमानुष छळाचा आणखी एक धक्कादायक प्रकार मारेगाव पोलिसांनी उघडकीस आणला आहे. भर उन्हात बैलांना अक्षरशः वाहनांमध्ये कोंबून, चारापाणी व संरक्षणाविना वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईत दोन वाहनांसह तब्बल ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या धडक कारवाईने गोवंश तस्करी करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गौराळा शिवार परिसरातून संशयास्पदरीत्या गोवंश वाहतूक होत असल्याची माहिती मारेगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. यावेळी अशोक लेलँड दोस्त क्रमांक MH 34 BZ 8489 आणि महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH 34 AV 1037 या वाहनांमध्ये गोवंशांची अत्यंत निर्दयीपणे वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी वाहनांचे दरवाजे उघडताच धक्कादायक वास्तव समोर आले. बैलांना आखूड दोऱ्यांनी घट्ट बांधून वाहनात निर्दयपणे कोंबण्यात आले होते. ४३ ते ४५ अंश तापमानात वाहनांवर कोणतेही आच्छादन नव्हते. जनावरांसाठी चारापाणी किंवा हवा खेळती राहील अशी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. या अमानुष प्रकारामुळे गोवंशांच्या जीवितालाच धोका निर्माण झाला होता. तसेच वाहन चालकांजवळ वाहनांची कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याने पोलिसांचा संशय आणखीच बळावला.

त्यामुळे पोलिसांनी गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या विठ्ठल लक्ष्मण वागदरकर (३९) रा. वरोरा जि. चंद्रपूर, रत्नाकर मारोती वाकुळकर (४२) रा. टाकळी (डोंगरगाव रेल्वे) जि. चंद्रपूर आणि शनिदेवा शिवशंकर पांडे (२५) रा. वरोरा जि. चंद्रपूर या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार शाम वानखेडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगांबर किनाके व पो. शि. सागर दिपेवार करीत आहे.

कारवाईदरम्यान दोन वाहने आणि चार गोवंशीय बैल असा एकूण ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मारेगाव पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गोवंशांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले असून, अशा प्रकारांवर पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

No comments:

Powered by Blogger.