शहरातील गौरकार ले-आऊट परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न अखेर संतप्त महिलांच्या आंदोलनात परिवर्तित झाला. मागील १२ ते १३ दिवसांपासून नळांना पाणी न आल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी थेट नगरपालिकेवर धडक देत मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र समस्येवर तोडगा काढण्याऐवजी एका महिलेला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप होताच वातावरण चांगलेच तापले. संतप्त झालेल्या महिलेने नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर भर उन्हातच ठिय्या आंदोलन सुरू केल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली.
गौरकार ले-आऊट परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून कमी दाबाचा व अनियमित पाणीपुरवठा ही गंभीर समस्या बनली आहे. रात्री-अपरात्री नळ सोडले जात असल्याने नागरिकांना रात्र जागून पाणी भरावे लागते. त्यातही शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. अनेकदा तक्रारी करूनही नगरपालिकेकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्याचप्रमाणे पाणी पुरवठा कंत्राटदाराकडून कुत्रिम पाणी टंचाई निर्माण करण्यात येत असल्याचा आरोपही होत आहे.
दरम्यान, मागील दोन आठवड्यांपासून परिसरातील काही भागात पूर्णपणे पाणीपुरवठा बंद असल्याने महिलांचा संताप अनावर झाला. महिलांनी नगरपालिकेत धाव घेत मुख्याधिकारी सचिन गाडे यांना निवेदन देत परिसरातील पाईपलाईनला जोडलेले वॉल बंद करून बुजविण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. त्यामुळेच काही भागात पाणी पोहोचत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी नगरसेवक अजय धोबे व प्रणिता देऊळकर हेही उपस्थित होते.
याच चर्चेदरम्यान अर्चना कांबळे या महिलेला मुख्याधिकाऱ्यांनी अपमानास्पद शब्द वापरत बोलण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात आला. “नेहमी तुम्हीच समोर येता” असे म्हणत त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे अर्चना कांबळे यांनी सांगितले. परिसरातील प्रश्न मांडणे हा गुन्हा आहे काय, असा संतप्त सवाल उपस्थित करत त्यांनी थेट नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच भर उन्हात ठिय्या आंदोलन सुरू केले.
विशेष म्हणजे, उन्हाचा पारा चढलेला असताना तब्बल तीन ते चार तास त्या नगरपालिकेसमोर ठिय्या मांडून बसल्या होत्या. “मुख्याधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याशिवाय येथून उठणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. मात्र यानंतरही मुख्याधिकाऱ्यांनी कोणताही तोडगा न काढता ते थेट नगर पालिका कार्यालयातून निघून गेल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढला. मात्र ४ तासानंतर सीईओ परत आले आणि त्यांनी ठिय्या मांडून बसलेल्या अर्चना कांबळे यांच्या जवळ येऊन कुणाचाही अपमान करण्याचा माझा कुठलाच हेतू नव्हता असे स्पष्ट केले. त्यानंतर अर्चना कांबळे यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.
दरम्यान, या संदर्भात मुख्याधिकारी सचिन गाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “तांत्रिक कारणामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता,” असे सांगितले. मात्र परिसरातील वॉल बंद करून बुजविण्यात आल्याच्या आरोपावर त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर देणे टाळले.
गौरकार ले-आऊट परिसर विकासाच्या बाबतीत कायम दुय्यम ठरल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. सिमेंट रस्त्यांनंतरही मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम असून, पाणीपुरवठ्याच्या समस्येने नागरिकांचे जीवन अक्षरशः हैराण झाले आहे. आता या आंदोलनानंतर तरी प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत.


No comments: