समाजात पोलिसांविषयी अनेकदा वेगवेगळ्या भावना व्यक्त केल्या जातात. मात्र संकटाच्या क्षणी मदतीचा हात देत सामान्य माणसाचा विश्वास जपणारी खाकी आजही तितक्याच संवेदनशीलतेने उभी आहे, याचा प्रत्यय वणी बस स्थानकावर घडलेल्या एका घटनेतून आला. एका महिलेची रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे असलेली हरविलेली बॅग एका पोलिसाला मिळाल्यानंतर त्या पोलिसाने संबंधित महिलेचा शोध घेऊन प्रामाणिकपणे ती बॅग महिलेला परत दिल्याने तिच्या डोळ्यांत समाधान आणि कृतज्ञतेचे अश्रू तरळले.
टाकळघाट (ता. हिंगणा, नागपूर) येथील पूजा वीरू राऊत ही महिला रविवारी दुपारी वणी बस स्थानकावर उतरली. प्रवासाच्या गडबडीत त्यांची हँडबॅग नकळत हरवली. बॅगमध्ये रोख रक्कम, आवश्यक कागदपत्रे आणि वैयक्तिक वस्तू असल्याने त्या घाबरून गेल्या. गर्दीत हरवलेली बॅग पुन्हा मिळेल की नाही, या चिंतेने त्यांनी बसस्थानक परिसरात वारंवार शोध घेतला; मात्र काहीच हाती लागले नाही.
दरम्यान, कर्तव्यावर असलेले वणी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई रितेश यांना वणी बसस्थानक परिसरात एक बेवारस बॅग आढळली. त्यांनी तत्काळ बॅग ताब्यात घेत तपासणी केली असता त्यात रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे दिसून आले. कोणताही मोह न बाळगता त्यांनी वरिष्ठांना माहिती देत बॅग मालकाचा शोध सुरू केला.
काही वेळातच पूजा राऊत यांचा शोध लागल्यानंतर पोलिसांनी योग्य ती खातरजमा करून ती बॅग त्यांच्या सुपूर्द केली. कष्टाची कमाई आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली हरविलेली बॅग परत मिळाल्यानंतर पूजा राऊत यांना मोठा दिलासा मिळाला. भावुक होत त्यांनी वणी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.
आजच्या काळात हरवलेली वस्तू परत मिळणे दुर्मीळ मानले जात असताना, वणी पोलिसांनी दाखवलेली प्रामाणिकता आणि माणुसकी नागरिकांच्या मनाला स्पर्श करून गेली. खाकी वर्दीतील संवेदनशीलतेचा हा प्रसंग अनेकांच्या मनात विश्वासाचा किरण निर्माण करणारा ठरला आहे.


No comments: