नेतृत्व केवळ राजकारणातून सिद्ध होत नाही, तर समाजाशी जपलेल्या नात्यातून त्याची खरी ओळख निर्माण होते. शेतकरी, कामगार नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त याच सामाजिक जाणिवेचा प्रत्यय वणीकरांना आला. विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा झालेला हा वाढदिवस शहरात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला.
सकाळी शेतकरी मंदिर येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला युवकांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशातून शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी जपली. लाईफलाईन रक्तपेठी, नागपूर यांच्या सहकार्याने रक्त संकलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संजय खाडे यांच्या लोकाभिमुख कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
दुपारच्या सत्रात पळसोनी येथील बाजीराव वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांना कपडे, चप्पल व जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. वृद्धांशी आत्मीयतेने संवाद साधत त्यांना आपलेपणाची ऊब देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करून सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देण्यात आला.
सायंकाळी ६ वाजता खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते धनंजय खाडे संचालित “डीएसके कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स” या नव्या व्यावसायिक कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. उद्घाटन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. या नव्या उपक्रमामुळे स्थानिक स्तरावर विकासाभिमुख कामांना गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यानंतर शेतकरी मंदिर येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संजय खाडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सामाजिक कार्य, सहकार क्षेत्रातील योगदान आणि सर्वसामान्यांशी कायम जपलेली जवळीक यामुळे संजय खाडे यांनी लोकनेते म्हणून वेगळी ओळख निर्माण केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी संजय खाडे फाउंडेशन, जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्था, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था, काँग्रेस कार्यकर्ते तसेच संजय खाडे मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले. समाजकार्याला प्राधान्य देत वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमांची शहरात दिवसभर चर्चा रंगली होती.


No comments: