Latest News

Latest News
Loading...

फावड्याने मोठ्या भावावर जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत


प्रशांत चंदनखेडे वणी :-

मारेगाव तालुक्यातील देवाळा येथे कौटुंबिक वादातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, लहान भावाने मोठ्या भावावर फावड्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकाला प्रथम मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामदास संभाजी बावने (वय ७६, रा. केगाव) यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सुनिल बाबाराव बावने (वय ३०, रा. देवाळा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे.

ही घटना २३ मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी यांना त्यांच्या नातेवाईकांकडून फोनवरून माहिती मिळाली की, सुनिल बावने याने त्याचा मोठा भाऊ अनिल बावने (वय ३५) याच्या डोक्यावर फावड्याने वार केले आहेत. माहिती मिळताच रामदास बावने हे देवाळा येथे पोहोचले असता अनिल हा घरातील हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसून आला.

यावेळी त्यांना स्थानिक नागरिकांनी सांगितले की, आरोपी सुनिल बावने याने प्रथम अनिलवर हल्ला करून पळ काढला. त्यानंतर तो पुन्हा घरी परत आला आणि जखमी अवस्थेत असलेल्या अनिलवर पुन्हा फावड्याने वार करत त्याला गंभीर जखमी केले.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, घटनेचा पुढील तपास ठाणेदार शाम वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगांबर किनाके करीत आहे.

No comments:

Powered by Blogger.