Latest News

Latest News
Loading...

सामाजिक उपक्रमांची परंपरा जपत संजय खाडे यांचा वाढदिवस होणार साजरा


प्रशांत चंदनखेडे वणी :-

सामाजिक बांधिलकी, लोकाभिमुख नेतृत्व आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे शेतकरी व कामगार नेते संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त २३ मे रोजी वणी शहरात विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या निमित्ताने शहरात उत्साहाचे आणि सामाजिक जाणिवेचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव, महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे संचालक तसेच जय जगन्नाथ मल्टिक्रेडीट को-ऑप सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या संजय खाडे यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची वेगळी छाप उमटविली आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना सहकार्य, शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग यामुळे ते लोकांचे विश्वासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी १० वाजता शेतकरी मंदिर येथे संजय खाडे फाउंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन समाजहिताच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दुपारच्या सत्रात वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. समाजातील ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि सामाजिक संवेदनशीलता जपण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.

सायंकाळी ६ वाजता डीएसके कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट या नव्या व्यावसायिक कार्यालयाचे उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होणार असून, उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके राहणार आहेत. संजय खाडे यांचे चिरंजीव धनंजय खाडे यांच्या पुढाकारातून सुरू होत असलेल्या या उपक्रमाकडे विकासाभिमुख आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारे महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी संजय खाडे फाउंडेशन, जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्था, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था, मित्रपरिवार व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमांमुळे संजय खाडे यांच्या सामाजिक कार्याची पुन्हा एकदा प्रचिती येत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments:

Powered by Blogger.