Latest News

Latest News
Loading...

‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या डिजिटल वादळाने प्रस्थापितांचे धाबे दणाणले! ‘कॉक्रोच जनता पार्टी’ पेजला लाखोंचा प्रतिसाद


प्रशांत चंदनखेडे वणी :-

सोशल मीडियावर एखादा शब्द कधी ट्रेंड होईल आणि त्यातून कोणती नवी लाट निर्माण होईल, याचा अंदाज बांधणं आता कठीण झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलेल्या “कॉक्रोच” या शब्दाने आता थेट डिजिटल आंदोलनाचं रूप घेतलं असून, “कॉक्रोच जनता पार्टी” नावाच्या एका पेजने समाज माध्यमांवर अक्षरशः वादळ निर्माण केलं आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील ३० वर्षीय अभिजित दिपके या तरुणाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर “कॉक्रोच जनता पार्टी” हे पेज तयार केले आणि अवघ्या तीन ते चार दिवसांत या पेजला लाखो युवकांनी फॉलो केल्याने सोशल मीडियात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे या पेजचे फॉलोअर्स काही प्रमुख राजकीय पक्षांच्या सोशल मीडिया आकड्यांनाही टक्कर देत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

सरन्यायाधीशांच्या वक्तव्यानंतर पेटली चर्चा
एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी “समाजात काही परजीवी आहेत” तसेच “रोजगार किंवा व्यवसायात स्थान न मिळालेले काही तरुण झुरळांसारखे सोशल मीडियावर हल्ले करतात” अशा आशयाचे निरीक्षण नोंदविल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. विशेषतः बेरोजगारी, व्यवस्थेविरोधातील नाराजी आणि युवकांच्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर “कॉक्रोच” हा शब्द तरुणांमध्ये वेगाने व्हायरल झाला.

याच शब्दातून अभिजित दिपके याला “कॉक्रोच जनता पार्टी” ही भन्नाट संकल्पना सुचली. पाहता पाहता हे पेज सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले. अनेक युवकांनी या पेजशी स्वतःला जोडत व्यवस्थेविरोधातील भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली.

जेनजीच्या असंतोषाला डिजिटल व्यासपीठ?
राजकीय आणि सामाजिक वर्तुळात आता या पेजची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. “कॉक्रोच जनता पार्टी” ही केवळ मिश्किल संकल्पना आहे की जेनजीच्या विचारांचा डिजिटल उद्रेक, यावर विश्लेषकांमध्ये मतमतांतरे सुरू झाली आहेत.

या पेजवरून बेरोजगारी, शिक्षण, रोजगार, स्पर्धा परीक्षा, व्यवस्थेतील विसंगती आणि तरुणांच्या प्रश्नांवर उपरोधिक पद्धतीने पोस्ट टाकण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या पेजशी जोडण्यासाठी काही मिश्किल अटी ठेवण्यात आल्या असून, शासनाकडे काही मागण्याही मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे पेज केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता सामाजिक आणि राजकीय चर्चेचं केंद्र ठरत आहे.

“जेनजीला कमी लेखू नका”
या पेजचे निर्माते अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, “जेनजीला कमी लेखू नका,” असा थेट इशारा दिला आहे. तसेच भारतीय संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट करत, “हे संघटन लोकशाही मार्गानेच आवाज उठवेल,” असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सरन्यायाधीशांनी नंतर आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे स्पष्टीकरण दिले असले तरी सोशल मीडियावरील संताप आणि चर्चेचे वादळ काही शांत झालेले दिसत नाही. उलट “कॉक्रोच” या एका शब्दाने देशातील युवकांच्या मनातील असंतोषाला डिजिटल अभिव्यक्ती मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

रॅप साँगपासून मीम्सपर्यंत ‘कॉक्रोच’चा जलवा
“कॉक्रोच जनता पार्टी” या नावावरून आता रॅप साँग, मीम्स, व्यंगचित्रे आणि ट्रेंडिंग रील्सची लाट उसळली आहे. अनेक युवक या पेजशी जोडले जात असून, सोशल मीडियावर “कॉक्रोच मूव्हमेंट” ही नव्या प्रकारची डिजिटल चळवळ ठरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.