६१ यशस्वी विद्यार्थ्यांचा आमदार संजय देरकर यांच्या हस्ते गौरव; युवा चेतना क्लब व ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्राचा प्रेरणादायी उपक्रम
विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शासकीय सेवेकडे दमदार वाटचाल करणाऱ्या ६१ विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा वणी येथील शेतकरी मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. युवा चेतना क्लब व ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्र, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
ऑगस्ट २०२५ ते मे २०२६ या कालावधीत पीएसआय, एसटीआय, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य विभाग, महावितरण, आर्मी, सीआरपीएफ, सीआयएसएफ आदी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले अभ्यासिकेचे संचालक संजय खाडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य प्रसाद खानझोडे, प्रतिक्षा गुरनुले, इजहार शेख, आशीष खुळसंगे, समीर लेनगुळे, मनीष बत्रा आणि दीपक मोहितकर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना आमदार संजय देरकर यांनी विद्यार्थ्यांच्या जिद्द, परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचे कौतुक केले. “ग्रामीण भागातील विद्यार्थी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास कोणतीही स्पर्धा जिंकू शकतात. वणी विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश ही या क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव केला. आमदारांच्या हस्ते सन्मान मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
युवा चेतना क्लब गेल्या ३५ वर्षांपासून प्रा. दिलीप मालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्र गेल्या ११ वर्षांपासून वैभव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करीत आहे. या संस्थांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे अनेक युवकांना शासकीय सेवेत संधी मिळत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी वैभव ठाकरे यांनी तयार केलेला स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम लोकमान्य टिळक महाविद्यालयात पदवी स्तरावर लागू करण्याचा मानस व्यक्त केला. भविष्यात हा अभ्यासक्रम विद्यापीठ स्तरावरही लागू व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात आशीष खुळसंगे यांनी प्रा. दिलीप मालेकर व वैभव ठाकरे यांचे वणीच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अधोरेखित केले. प्रतिक्षा गुरनुले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले, तर अध्यक्ष संजय खाडे यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकार्याची ग्वाही दिली.
यावेळी आमदार संजय देरकर यांच्या हस्ते प्रा. दिलीप मालेकर, वैभव ठाकरे आणि उपसंचालक प्रदीप मोहरे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश भगत यांनी केले, तर आभार शुभम राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रदीप मोहरे, रोशन भोयर, निखिल फुसे, विकास बांदुरकर, निखिल चिने, मयूर पेंदोर आदींनी परिश्रम घेतले.


No comments: