शेतातून बकऱ्या चोरणारी टोळी जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई ; तीन आरोपी अटकेत, ३.८० लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी शहर व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातून बकऱ्या चोरी करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळच्या पथकाने पर्दाफाश केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत चोरीतील रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी परिसरात फरार व रडारवर असलेल्या आरोपींची शोध मोहीम राबवत होते. यादरम्यान पथकाला वणी पोलीस ठाण्यात दाखल बकरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी जत्रा मैदान परिसरात थांबले असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वात सापळा रचून सीताराम आसाराम भिसे (२४), सुनील रामप्रसाद साळुंखे (२७) आणि संजय राजू वायकर (२३, सर्व रा. गोकुल नगर, वणी) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी वणी पोलीस ठाण्यातील बकरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.
पथकाने आरोपींची अधिक कसून चौकशी केली असता, त्यांनी सन २०२४ ते २०२६ या कालावधीत वणीसह इतर भागातही बकरी चोरीचे अनेक गुन्हे केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तसेच त्यांनी चोरी केलेल्या बकऱ्या विविध आठवडी बाजारात विक्री केल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले.
या कारवाईदरम्यान आरोपी सुनील साळुंखे याच्याजवळून चोरीच्या शेळ्या विक्रीतून मिळालेली ७० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले टाटा कंपनीचे पिकअप वाहन (क्रमांक MH-29-BE-8012) जप्त करण्यात आले. वाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत ३ लाख ८० हजार रुपये असल्याचे पथकाने सांगितले आहे.
दरम्यान, आरोपींनी पोलीस ठाणे पारवा येथील अपराध क्रमांक ०३/२०२६ तसेच पोलीस ठाणे वडकी येथील अपराध क्रमांक ४८६/२०२४ आणि ६६२/२०२४ मधील गुन्ह्यांचीही कबुली दिल्याने त्यांच्याकडून आणखी अनेक चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गुन्ह्यातील सचिन वायकर हा आरोपी फरार असून एलसीबीचे विशेष पथक त्याच्या मागावर आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चवरे, सपोनि दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, पोहवा सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, पोका सलमान शेख आणि चालक पोहवा नरेश राऊत यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.



No comments: