Latest News

Latest News
Loading...

बहिणीच्या छळाचा संताप अनावर; भावाचा जावयावर रक्तरंजित हल्ला


प्रशांत चंदनखेडे वणी :-

विवाहितेवर पतीकडून होत असलेल्या कथित अत्याचाराचा संताप अखेर रक्तरंजित हल्ल्यात परिवर्तित झाल्याची थरकाप उडविणारी घटना गुरुवारी मध्यरात्री शहरातील शास्त्रीनगर परिसरात घडली. बहिणीच्या वारंवार होणाऱ्या तक्रारींमुळे संतप्त झालेल्या भावाने थेट जावयाच्या घरात घुसून धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला चढविला. या भीषण हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाला असून त्याच्या बचावासाठी धावलेल्या काका काकुंवरही आरोपीने सपासप वार केल्याने तिघांनाही गंभीर अवस्थेत चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या अक्षय बोढे वय अंदाजे ३२ ते ३३ वर्षे याचा विवाह चंद्रपूर येथील एका तरुणीसोबत झाला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच पतीकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याच्या तक्रारी पत्नी माहेरी करू लागली. बहिणीचे फोन आणि तिची व्यथा ऐकून भाऊ संतप्त झाला होता.

दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री आरोपी काही सहकाऱ्यांसह थेट जावयाच्या घरी पोहोचला. त्यावेळी अक्षय घरात नसल्याने बहिणीनेच त्याला फोन करून घरी बोलावल्याची माहिती समोर आली आहे. अक्षय घरी पोहोचताच बहिणीला त्रास देण्याच्या कारणावरून वादाला सुरुवात झाली. काही क्षणांतच हा वाद हिंसक वळणावर गेला आणि आरोपीने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने अक्षयवर सपासप वार करण्यास सुरुवात केली.

मानेवर आणि शरीरावर क्रूरपणे घाव घातल्याने अक्षय रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. पुतण्यावर जीवघेणा हल्ला होत असल्याचे पाहून त्याचे काका व काकू मध्यस्थी करण्यासाठी धावले असता आरोपीने त्यांच्यावरही शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले.

मध्यरात्रीच्या या रक्तरंजित थराराने शास्त्रीनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने तिघांनाही पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. जखमी अक्षयची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवत मुख्य संशयितासह एका महिलेला ताब्यात घेतले असून इतर साथीदार फरार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.