ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पशुधन म्हणजे केवळ जनावरे नसतात, तर तो त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार असतो. मात्र वणी तालुक्यातील बेसा (लाठी) येथे एका भीषण आगीने हा आधारच हिरावून घेतला. गोठ्याला अचानक आग लागली आणि आठ शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेने शेतकरी दत्तू गोहोकार पुरता हादरला. या दुर्दैवी घटनेमुळे गोहोकार कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.
शनिवारी दुपारच्या सुमारास गोठ्याला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले आणि गोठ्यात बांधलेल्या शेळ्या ज्वाळांच्या विळख्यात सापडल्या. आग विझविण्याचे प्रयत्न होण्यापूर्वीच आठही शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. आयुष्यभराच्या कष्टातून उभा केलेला शेळीपालन व्यवसाय एका क्षणात राख झाल्याने दत्तू गोहोकार यांच्यावर अक्षरशः दु:खाचा डोंगर कोसळला.
घटनेची माहिती मिळताच वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी तात्काळ बेसा गाव गाठले. त्यांनी घटनास्थळी पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्वरित पंचनामा करण्याचे निर्देश दिले. तसेच शासनाच्या नियमांनुसार आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
यावेळी आमदार देरकर म्हणाले, "शेतकरी आणि पशुपालक हे मोठ्या मेहनतीने आपला संसार उभा करतात. अशा दुर्घटनांमुळे त्यांचे प्रचंड नुकसान होते. शासनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील."
दत्तू गोहोकार हे शेतीसोबत शेळीपालन व्यवसायावर अवलंबून होते. या घटनेत त्यांच्या सर्व शेळ्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोतच नष्ट झाला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
संवेदनशीलतेची जपली परंपरा
दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून आमदार संजय देरकर यांनी शेतकऱ्याच्या दुःखात सहभागी होत प्रशासनाला तत्काळ हालचाल करण्यास भाग पाडले. संकटाच्या काळात लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याची भावना यामुळे ग्रामस्थांमधून व्यक्त होत होतांना दिसली.
एका आगीने हिरावला उदरनिर्वाहाचा आधार
गोठ्यातील आठ शेळ्या म्हणजे केवळ पशुधन नव्हते, तर एका शेतकरी कुटुंबाच्या भविष्यातील आशा आणि उत्पन्नाचा आधार होता. काही मिनिटांतच त्या राख झाल्याने गोहोकार कुटुंबावर आर्थिक आणि मानसिक आघात झाला आहे. आता शासनाच्या मदतीकडेच या कुटुंबाच्या आशेच्या नजरा लागल्या आहेत.

No comments: