कचऱ्याची बादली घराजवळ ठेवल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन शेजारी कुटुंबांमध्ये झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहोचल्याची घटना तालुक्यातील नांदेपेरा येथे घडली. या वादात एका वृद्ध शेतकऱ्याच्या डोक्यावर काठी मारण्यात आल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यासह मुलगा व सुनेलाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत महादेवराव खामणकर (वय ६६) हे २३ मे रोजी सकाळी पत्नी व मुलासह शेतातील कामे करण्यासाठी गेले होते. दुपारी घरी परतल्यानंतर त्यांच्या घरासमोर राहणारे मुकेश खामणकर व त्यांची पत्नी हे यशवंत खामणकर यांच्या सुनेशी वाद घालत असल्याचे दिसून आले.
घरातील कचऱ्याची एक बादली त्यांच्या घराजवळ ठेवण्यात आल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचे सांगितले जाते. यावेळी वृद्ध यशवंत खामणकर यांनी मध्यस्थी करून दोन्ही बाजूंनी सुरु असलेला वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद निवळण्याऐवजी तो आणखीच वाढत गेला.
तक्रारीनुसार, आरोपी महिलेने यशवंत खामणकर यांची कॉलर पकडून मारहाण केली, तर मुकेश खामणकर याने हातातील लाकडी काठीने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला.
दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी धावून आलेली त्यांची सुन व मुलगा भूषण खामणकर यांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच पुन्हा वाद केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
जखमी अवस्थेतच यशवंत खामणकर यांनी वणी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मात्र डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर केले. उपचारानंतर त्यांनी २६ मे ला पोलीस ठाण्यात येऊन सविस्तर तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुकेश रामदास खामणकर (३४) व त्यांच्या पत्नीवर बीएनएसच्या कलम 115(2), 118(1), 351(2)(3), 352, 3(5) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
घरगुती कचऱ्याच्या एका बादलीवरून सुरू झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याने गावकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. शेजारधर्म विसरून वाढत चाललेले किरकोळ वाद आता गंभीर गुन्ह्यांचे रूप धारण करू लागल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

No comments: