शासनाचे आदेश धाब्यावर बसवत महाराष्ट्र दिनी ‘ड्राय-डे’च्या दिवशीच शहरात बियरबारमधून उघडपणे दारू विक्री सुरू असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कायद्याला अक्षरशः हरताळ फासत, चोरदरवाजातून ग्राहकांना प्रवेश देत आणि आत बसवून दारू पाजत बारमालकांनी ड्राय-डेची थेट खिल्ली उडवली.
इंदिरा चौक, वरोरा मार्ग, मुकुटबन रोड, वागदरा रोड आणि लालपुलिया परिसरातील काही बारमध्ये दिवसभर ‘शटर डाऊन, धंदा ऑन’ अशी परिस्थिती दिसून आली. समोरून बार बंद असल्याचा आभास निर्माण केला गेला; मात्र चोर दरवाजातून ग्राहकांची ये-जा सुरूच होती. एवढेच नव्हे, तर काही ठिकाणी ग्राहकांना आत बसवून ‘सेवा’ देण्यात आल्याने नियमांचा सर्रास बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या उघडउघड सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकाराकडे उत्पादन शुल्क विभागाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा गंभीर आरोप नागरिकांतून होत आहे. “अधिकाऱ्यांच्या मूक संमतीशिवाय हे शक्यच नाही,” अशी उघड चर्चा रंगू लागली आहे. काही बारमालक राजकीय पाठबळाच्या जोरावर कायद्याला जुमानत नसल्याचा आरोपही पुढे येत आहे.
पूर्वी ड्राय-डेच्या दिवशी लपूनछपून दारू विकली जात असे; मात्र आता बारमधूनच राजरोस विक्री होत असल्याने प्रशासनाचा धाक संपल्याची भावना उघड होत आहे. ड्राय-डे वगळताही शहरातील काही बियरबार पहाटेपर्यंत सुरू राहत असल्याची माहिती समोर येत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत कोण दाखवणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
या सर्व प्रकारामुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. “अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक, निर्भीड आणि प्रामाणिक अधिकारी नेमावेत,” अशी ठाम मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे.

No comments: