प्रशांत चंदनखेडे वणी :-
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने घरफोडी प्रकरणातील फरार आरोपीचा कौशल्यपूर्ण पद्धतीने शोध लावून सापळा रचून त्याला मोठ्या शिताफीने अटक केली. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपीने आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली असून या कारवाईतून घरफोडीचा आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे. कारवाईदरम्यान आरोपीजवळून ९ लाख ३० हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मारेगाव पोलीस ठाण्यातील घरफोडीचा गुन्हा उघड करताना पोलिसांनी यापूर्वीच मोठी कारवाई करत २१ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. मात्र या गुन्ह्यातील नथ्थु नागू कुरकुटे (वय ३०, रा. मोहदरी ता. उमरखेड) हा आरोपी फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पथक सातत्याने प्रयत्नशील होते.
दरम्यान, १ मे रोजी आरोपी हा पुसद-उमरखेड मार्गावरील कोपरा फाटा परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपली ओळख नथ्थु कुरकुटे अशी सांगताच तोच संबंधित गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे स्पष्ट झाले.
त्याची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या जवळ सोन्या-चांदीचे दागिने आढळून आले. एलसीबी पथकाने त्याची आणखी कसून चौकशी करताच त्याने पोपटासारखे बोलत साथीदारांसह मारेगाव येथे आणखी एक घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी नोंदी तपासल्या असता हा मुद्देमाल पोलीस स्टेशनला नोंद असलेल्या घरफोडीच्या गुन्हातील असल्याचे स्पष्ट झाले.
एलसीबी पथकाने या कारवाईत एकूण ९,३०,३०८ रुपयांचे दागिने जप्त केले असून असून मुद्देमालासह आरोपीला पुढील तपासासाठी मारेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे, सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि धनराज हाके, पोलीस अंमलदार सुधिर खंडागळे, सुधिर पांडे, सुभाष जाधव, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, रजनीकांत मडावी, चापोना सतीश फुके यांनी केली.

No comments: