आजच्या डिजिटल युगात आणि आधुनिक जीवनशैलीत मोबाईलचा वापर प्रचंड वाढल्याने वाचनाची सवय हळूहळू कमी होत चालल्याची खंत व्यक्त करत विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवणे ही आजच्या काळाची खरी गरज असल्याचे मत माजी आमदार तथा नगर वाचनालयाचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केले. ते नगर वाचनालय, वणी यांच्या वतीने आयोजित बालवाचन सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत १ मे रोजी या बालवाचन सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्ताराव्यात, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अभिजित अणे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून स्नेहलता चुंबळे, सुनील वाटेकर आणि वैजनाथ खडसे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्नेहलता चुंबळे यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीत व बालगीताने झाली.
आपल्या उद्घाटनपर भाषणात पुढे बोलताना माजी आमदार बोदकुरवार यांनी आज पालकांच्या हातात पुस्तकांऐवजी मोबाईल दिसत असल्याने बालकांवर होणाऱ्या संस्कारांवर परिणाम होत असल्याचे म्हटले. वाचनामुळे विचारांची परिपक्वता वाढते आणि व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. अभिजित अणे यांनी ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश देत विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले.
१ ते ७ मे दरम्यान चालणाऱ्या या सप्ताहात विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार असून प्रा. स्वानंद पुंड, डॉ. सुवर्णा चरपे, शेखर वांढरे, स्नेहलता चुंबळे, सुनील वाटेकर, वैजनाथ खडसे आणि प्रवीण सातपुते यांचे उद्बोधन होणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले, तर आभार प्रदर्शन संचालक अर्जुन उरकुडे यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार आणि कल्पना राठोड हे परिश्रम घेत आहेत.


No comments: