Latest News

Latest News
Loading...

कुटुंब बाहेरगावी गेलं आणि चोरट्यांनी साधला डाव; बंद घर फोडून अडीच लाखांहून अधिकचा ऐवज लंपास


प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील विठ्ठलवाडी परिसरात कुलूपबंद घराला टार्गेट करून चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत जवळपास तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. घराला कुलूप लागले असल्याची संधी साधून चोरट्यांनी चोरीचा डाव साधला. मुख्य दरवाजाचा कुलूपकोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी (वडगाव रोड) परिसरात राहणारे तालीब अय्युब खान (वय २८) हे २२ मे रोजी कुटुंबासह नागपूर येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कुलूपकोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूम मधील कपाट फोडून त्यातील मौल्यवान वस्तू व रोख रक्कमेवर हात साफ केला.

चोरट्यांनी तीन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचा गोफ, सोन्याचा हार असे एकूण ३७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि ८० हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे, चोरट्यांनी घरातील कपाट आणि साहित्याची झडती घेत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

तालीब खान हे ३१ मे रोजी दुपारी नागपूरहून घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा आणि कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश करताच त्यांना घरातील वस्तू अस्ताव्यस्त फेकलेल्या दिसून आल्या. तसेच कपाटाचे दार उघडे दिसले. त्यांनी कपाटाची पाहणी केली असता त्यांना कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व रोकड गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने वणी पोलिसांना ही माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 331(3), 331(4), 305(a) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश वडतकर करीत आहेत.

बंद घरांवर चोरट्यांची नजर?
उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि कौटुंबिक कार्यक्रमांमुळे अनेक कुटुंबे घराला कुलूप लावून बाहेरगावी जात असल्याची संधी साधून चोरटे बंद घरे हेरून चोरीचा डाव साधत आहेत. त्यामुळे बंद घरे चोरट्यांच्या रडारवर असल्याचे या घटनेवरून परत एकदा समोर आले आहे. घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी घर बंद ठेवताना अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या शोधात
घरफोडी करणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, संशयितांच्या हालचालींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भरवस्तीत घडलेल्या या घरफोडीने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

No comments:

Powered by Blogger.