Latest News

Latest News
Loading...

वणी पोलीस ठाण्यात खांदेपालट; भानुदास पिदूरकर वणी पोलीस स्टेशनचे नवीन ठाणेदार


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी पोलीस ठाण्याच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण बदल झाला असून पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांची यवतमाळ आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले भानुदास पिदूरकर यांची वणी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा आस्थापना मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानंतर बदल्यांचे परिपत्रक जारी करण्यात आले.

वणी पोलीस ठाण्यात झालेल्या या खांदेपालटाची चर्चा पोलीस वर्तुळासह शहरातही रंगली आहे. गोपाल उंबरकर यांच्या बदलीबाबत काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र त्यांच्या बदलीचे आदेश अचानक जाहीर झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

दरम्यान, भानुदास पिदूरकर यांच्या नियुक्तीचे स्वागत होत असून त्यांच्याकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, त्यांनी यापूर्वी वणी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिले असल्याने शहरासह ग्रामीण भागातील परिस्थितीची त्यांना चांगली माहिती आहे.

अलीकडच्या काळात वणी शहर आणि परिसरात चोरी, घरफोडी, मारहाण, अवैध धंदे, गुटखा तस्करी आणि इतर गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करणे, गुन्हेगारी प्रवृत्तींवर अंकुश ठेवणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, ही जबाबदारी नव्या ठाणेदारांवर असणार आहे.

वणी हे शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जात असले तरी वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत भानुदास पिदूरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसिंगला नवी दिशा मिळेल आणि कायद्याचा धाक अधिक प्रभावीपणे निर्माण होईल, अशी अपेक्षा वणीकर व्यक्त करीत आहेत.

वणी पोलीस ठाण्यातील हा खांदेपालट आता केवळ प्रशासकीय बदल न राहता, शहराच्या कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. नव्या नेतृत्वाखाली पोलीस यंत्रणा किती प्रभावीपणे काम करते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.