यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीतील त्रुटींवरून आता निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. वणी नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका तथा माजी नगराध्यक्षा करुणा कांबळे यांनी मतदार यादीतील गंभीर चुका निदर्शनास आणत निवडणूक रद्द करण्याची तसेच निकाल जाहीर न करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
यासंदर्भात त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक आयुक्त आणि जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात मतदार यादी तयार करताना झालेल्या त्रुटींसह आक्षेप नोंदविण्यासाठी देण्यात आलेला अल्प कालावधीही प्रश्नांकित करण्यात आला आहे.
करुणा कांबळे यांनी म्हटले आहे की, वणी नगर परिषदेच्या नगरसेवकांची प्रारूप मतदार यादी २३ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती, तर अंतिम यादी २५ मे रोजी जाहीर करण्यात आली. प्रारूप यादीवर आक्षेप घेण्यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला. इतक्या कमी वेळेमुळे मतदार यादीची सखोल पडताळणी करणे शक्य झाले नाही. आक्षेप नोंदविण्यासाठी किमान ७२ तासांचा कालावधी आवश्यक होता, असे त्यांनी नमूद केले आहे.
निवेदनानुसार, मतदार यादीतील काही नोंदींमध्ये उमेदवारांच्या वडिलांचे व पतीचे नाव चुकीच्या पद्धतीने नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मतदार यादीच्या अचूकतेबाबत शंका निर्माण होत असून या त्रुटींची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मतदार यादीतील चुका दुरुस्त न करता निवडणूक प्रक्रिया पुढे नेणे योग्य ठरणार नाही, असा दावा करत करुणा कांबळे यांनी सद्यस्थितीत निवडणुकीचा निकाल जाहीर करू नये, तसेच संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करून नव्याने निवडणूक जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या तक्रारीमुळे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेबाबत नव्या चर्चांना तोंड फुटले असून, निवडणूक आयोग याबाबत कोणती भूमिका घेतो याकडे राजकीय वर्तुळासह संबंधित मतदारांचे लक्ष लागले आहे.

No comments: