प्रशांत चंदनखेडे वणी :-
समाजाच्या प्रगतीचा पाया शिक्षणात असतो आणि त्या शिक्षणातून घडणाऱ्या गुणवंतांचा सन्मान हा भविष्यातील यशस्वी पिढीला दिलेला प्रेरणेचा संदेश असतो. याच भावनेतून श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., वणी यांच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित या सोहळ्याने केवळ गुणवंतांचा गौरवच केला नाही, तर शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचा संगमही घडवून आणला. विद्यार्थ्यांच्या यशामागील अथक परिश्रम, पालकांचे त्याग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा सन्मान करणारा हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड. देवीदास काळे होते. तर संस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर, संचालक सुरेश बरडे, लिंगारेड्डी अंडेलवार, रमेश भोंगळे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली.
यशाच्या शिखरावर झेपावलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि आकर्षक भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि पालकांच्या डोळ्यांतील अभिमान हा सोहळ्याचा सर्वात भावनिक आणि संस्मरणीय क्षण ठरला.
यावेळी मार्गदर्शन करताना अध्यक्ष ॲड. देवीदास काळे यांनी विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांचे महत्त्व पटवून दिले. आधुनिकतेच्या युगात ज्ञानासोबत चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि सामाजिक भान जपण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासोबतच ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याचे आवाहन केले. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आज देशाच्या विविध क्षेत्रांत यशाची नवी शिखरे गाठत आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देताना यशाच्या या टप्प्यावर न थांबता नवनवीन ध्येय गाठण्याचा संदेश दिला. गुणवत्तेचा सन्मान आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची ही परंपरा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अष्टांगी चंदू परेकर, स्वरा महेश मुळेवार, हिरंकेश प्रवीण शेंडे, प्रज्ञा भास्कर खैरे, मानसी भारत लिपटे या १२ वीत गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच आरोही प्रमोद ढेंगळे, अनिकेत मधुकर तुराणकर, वैष्णवी नितीन भालेराव, ओजस सुरेंद्र दहिवालकर, वैष्णवी पिसाराम वाढई, इशिका कृष्णा अवघन, तमन्ना दिनकर बहादे, ऋतूजा गिरीश पाचभाई, तन्वी संपत पाचभाई या १० वी तील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
सहकार क्षेत्रात आर्थिक सेवा देतानाच सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेने या उपक्रमातून शिक्षण क्षेत्राप्रती असलेली आपली संवेदनशीलता आणि सकारात्मक दृष्टीकोन पुन्हा अधोरेखित केला. गुणवंतांचा गौरव हा केवळ सन्मानाचा कार्यक्रम नसून उद्याच्या पिढीला यशाच्या दिशेने प्रेरित करणारा दीपस्तंभ असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पायल परांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या अधिकारी, कर्मचारी आणि दैनिक अभिकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे हा सोहळा अधिक आनंददायी व प्रेरणादायी ठरला.

No comments: