प्रशांत चंदनखेडे वणी :-
एका अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली असून बालवयात तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. प्रथम बोटलावार (२०) असे या आरोपी तरुणाचे नाव आहे.
पाच वर्षांपूर्वी झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, आणि प्रेम शारीरिक संबंधांपर्यंत पोहचलं. तरुणाने अल्पवयीन मुलीच्या अजाणतेपणाचा फायदा घेत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, आणि यातून तिला गर्भधारणा झाली.
वणी शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीला (१७) आरोपीने प्रेमाच्या आणाभाका देऊन शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. तरुणीनेही आकर्षणाला प्रेम समजून त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला. प्रेमाच्या भूलथापा देऊन तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शारीरिक संबंधातून नंतर मुलीला गर्भधारणा झाली आणि ती ७ महिन्यांची गर्भवती राहिली.
मुलीच्या शारीरिक बदलांवरून पालकांना संशय आला व त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी मुलीला घेऊन तात्काळ पोलीस स्टेशन गाठले, आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
पालकांनी रीतसर तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

No comments: