Latest News

Latest News
Loading...

जेवण न दिल्याचा राग अनावर; ढाबा चालकाचा दांडक्याने ठेचून खून! पोलिसांनी काही तासांतच आरोपींना ठोकल्या बेड्या


प्रशांत चंदनखेडे वणी : 

जेवण मिळाले नाही म्हणून संतापलेल्या दोन युवकांनी थेट ढाबा चालकाचाच जीव घेतल्याची धक्कादायक घटना झरी तालुक्यातील मार्की (बु.) गावाजवळ घडली. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रक्तरंजित हत्याकांडात रूपांतर झाले असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, खून करून पसार झालेल्या आरोपींना मुकुटबन पोलिसांनी अवघ्या काही तासांतच अटक करून गुन्ह्याचा छडा लावला.

मृतकाचे नाव चंद्रशेखर उर्फ गजानन मोरेश्वर उदकवार (३२) असे असून ते मार्की (बु.) गावाजवळ अनेक वर्षांपासून ढाबा चालवत होते. या प्रकरणी सचिन सुधाकर टोंगे (३०) व साहिल राजेश काकडे (३८), रा. मार्की (बु.) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. दोन्ही आरोपी गजानन उदकवार यांच्या ढाब्यावर जेवणासाठी आले होते. त्यानंतर जेवणाच्या ऑर्डरवरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यांच्यातील तो वाद तेथेच मध्यस्थीने सोडविण्यात आला. मात्र त्या वादाचा राग मनात धरून असलेल्या आरोपींनी रात्री उशीरा ढाबा बंद झाल्यानंतर ढाब्यावर झोपून असलेल्या उदकवार यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला चढविला. 

त्यांनी लाकडी दांडक्याने गजानन उदकवार यांच्या डोक्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. लाकडी दांडक्याने डोक्यावर एकामागून एक वार करण्यात आल्याने उदकवार रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. आरोपींचा हल्ला इतका क्रूर होता की, गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ढाबा चालकाचा खून केल्यानंतर दोन्ही आरोपींनी तेथून पळ काढला. सकाळी ढाबा चालक उदकवार हे रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. खुनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

घटनेची माहिती मिळताच मुकुटबन पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवत विविध अंगांनी चौकशी सुरू केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक माहिती, स्थानिक माहितीदार आणि संशयितांच्या हालचालींची पडताळणी करत अवघ्या काही तासांत आरोपींचा शोध लावला. पोलिसांनी सचिन टोंगे आणि साहिल काकडे या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या वेगवान कारवाईमुळे गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा करण्यात मुकुटबन पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सतीश जाधव, पोहेकॉ. दीपक ताठे, आशिष गोखरे, आसिफ शेख, चंद्रशेखर राठोड आणि रवींद्र इसनकर यांच्या पथकाने केली.

किरकोळ कारण, थेट जीवावर बेतले
फक्त जेवण न मिळाल्याच्या कारणावरून एका कष्टकरी ढाबा चालकाचा जीव घेण्यात आल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. क्षणिक राग आणि बेजबाबदार हिंसाचारामुळे एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला असून, या घटनेने वाढत्या आक्रमकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

No comments:

Powered by Blogger.