निसर्गाच्या अवकृपेने एका कष्टकरी कुटुंबाचा आधार हिरावला गेल्याची हृदयद्रावक घटना वणी तालुक्यातील टाकळी (चिखली) येथे घडली. शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या अंगावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या १२ ते १३ बकऱ्याही दगावल्या. शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत व्यक्तीचे नाव विलास मानकु तुमराम (वय अंदाजे ४८ वर्षे) असे असून ते शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील टाकळी (चिखली) या गावातील रहिवासी होते. रोजच्या प्रमाणे ते शेळ्या घेऊन गावालगतच्या रानात चराईसाठी गेले होते. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला. आकाशात काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली.
पावसापासून बचाव करण्यासाठी विलास तुमराम यांनी रानातील एका झाडाखाली आश्रय घेतला. त्यांच्या शेळ्याही त्याच झाडाखाली जमा झाल्या. मात्र काही क्षणांत नेमकी त्याच झाडावर वीज कोसळली आणि भीषण दुर्घटना घडली. विजेच्या प्रचंड तडाख्यात विलास तुमराम यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेल्या १२ ते १३ बकऱ्याही क्षणात मृत्युमुखी पडल्या.
घटनेची वार्ता गावात पोहोचताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. एका क्षणात कुटुंबाचा कर्ता पुरुष आणि उपजीविकेचे साधन असलेल्या बकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. नैसर्गिक आपत्तीने अक्षरशः एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होतांना दिसली.
विलास तुमराम हे शेळीपालन व राखण करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आर्थिक संकटही ओढवले आहे. कुटुंबातील कर्त्या पुरुषासह शेळ्यांचाही मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने कुटुंबाच्या उपजीविकेचा आधारच हरपला आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर टाकळी गावात शोककळा पसरली असून मृतकाच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. निसर्गाच्या एका कोपाने क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि एका कष्टकरी कुटुंबाचं आयुष्यच उध्वस्त झालं. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

No comments: