इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या वास्तू दुर्लक्षित होऊन काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर असताना, वणीतील काही तरुण विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत शतकानुशतके जुन्या ऐतिहासिक बारवेला नवसंजीवनी दिली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी श्रमदानातून झाडे-झुडपे, काटेरी वेली आणि कचऱ्याने झाकलेल्या या प्राचीन पायऱ्यांच्या विहिरीची स्वच्छता करून वणीच्या सांस्कृतिक वारशाला पुन्हा एकदा उजाळा दिला.
वणी शहरातील जलशुद्धीकरण केंद्रामागे, नगाजी महाराज मंदिराजवळ असलेली ही बारव गोंड राजवटीच्या काळातील असल्याचे मानले जाते. सुमारे चार ते पाच शतकांचा इतिहास लाभलेली ही वास्तू अनेक वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत होती. परिसरात वाढलेल्या झाडाझुडपांमुळे आणि साचलेल्या कचऱ्यामुळे ही ऐतिहासिक बारव अक्षरशः नजरेआड झाली होती. अनेकांना तिचे अस्तित्वही माहीत नव्हते.
मात्र इतिहासाबद्दलची आस्था आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अभाविपच्या विद्यार्थ्यांनी या वास्तूकडे लक्ष वेधलं. वारसा संवर्धनाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी श्रमदानाचा संकल्प केला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. हातात कुऱ्हाडी, फावडे आणि झाडू घेऊन विद्यार्थ्यांनी परिसरातील झाडे-झुडपे हटवली, काटेरी वेली दूर केल्या आणि विहिरीत साचलेला कचरा बाहेर काढला. काही तासांच्या अथक परिश्रमानंतर काळाच्या पडद्याआड गेलेली बारव पुन्हा एकदा आपल्या मूळ रूपात उभी राहिली.
विशेष म्हणजे या बारवेच्या भिंतींवर आजही गोंडकालीन स्थापत्यकलेच्या खुणा स्पष्टपणे दिसून येतात. तसेच विविध देवतांच्या मूर्तींची कोरीव शिल्पे या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करते. काळाच्या झळा सहन करूनही या शिल्पांनी आपलं अस्तित्व जपलं आहे. या शिल्पांकडे पाहताना तत्कालीन कलावैभवाची साक्ष मिळते. स्थानिक इतिहास अभ्यासकांच्या मते, या बारवेतून चंद्रपूरसह इतर भागांकडे जाणारे भुयारी मार्ग असल्याच्या आख्यायिकाही परिसरात प्रचलित आहेत.
या उपक्रमात अमित उपाध्ये, वैभव वाघमारे, अनिकेत बदखल, संदीप गोहोकार, सागर जाधव, अक्षय कवरसे, कपिल राऊत, वैभव मेहता आणि नीरज चौधरी यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच अभाविपच्या नगरमंत्री आयुषी पुलेवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले.
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे केवळ एक ऐतिहासिक वास्तू स्वच्छ झाली नाही, तर वारसा संवर्धनाविषयी समाजात नवा संदेशही गेला आहे. स्वच्छतेनंतर नागरिकांची या बारवेकडे पुन्हा पावले वळू लागली असून, शहरातील ऐतिहासिक ठेव्यांच्या संरक्षणासाठी प्रशासनानेही पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इतिहास जपण्याच्या मोठमोठ्या घोषणा अनेकदा ऐकायला मिळतात; मात्र वणीतील या विद्यार्थ्यांनी कृतीतून इतिहास संवर्धनाचे खरे उदाहरण दिले आहे. "वारसा वाचला तरच इतिहास जिवंत राहील" या विचाराला प्रत्यक्ष आकार देणारा हा उपक्रम वणीच्या सांस्कृतिक ओळखीला नवी ऊर्जा देणारा ठरला आहे.

No comments: