प्रेमविवाहानंतर सहा महिन्यांतच संसाराचा भ्रमनिरास; नवविवाहितेची पती व सासू सासऱ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार
प्रेमाच्या आकर्षणात घरच्यांचा विरोध झुगारून प्रियकरासोबत पळून जाऊन विवाह केलेल्या एका तरुणीचा संसार अवघ्या सहा महिन्यांतच उद्ध्वस्त झाल्याची धक्कादायक घटना झरी तालुक्यातील मांडवी येथे समोर आली आहे. प्रेमविवाहानंतर सुरुवातीला सुखाचे स्वप्न दाखविणाऱ्या पतीकडून नंतर सतत मारहाण व छळ करण्यात आल्याचा आरोप पीडित विवाहितेने केला असून अखेर जीवाच्या भीतीने तिला पुन्हा आई-वडिलांचे घर गाठावे लागले.
मांडवी येथील 23 वर्षीय विवाहितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, सहा महिन्यांपूर्वी तिने शेजारी राहणाऱ्या श्रीकृष्ण दोसतवार याच्यासोबत घरातून पळून जाऊन विवाह केला होता. विवाहानंतर काही दिवस संसार सुरळीत सुरू होता. मात्र कालांतराने पती दारूच्या आहारी गेल्याने वाद वाढू लागले. किरकोळ कारणांवरून मारहाण करणे, शिवीगाळ करणे आणि मानसिक त्रास देणे हा प्रकार नित्याचाच झाल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे.
रविवारी रात्री आठच्या सुमारास पती दारूच्या नशेत घरी आला आणि वाद घालत तिला बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. काचेची बाटली डोक्यात मारल्याने ती जखमी झाली. त्यानंतर काठीनेही मारहाण करण्यात आली. या घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याचे सांगण्यात आले.
यावेळी सासरे आणि सासू यांनीही तिला घराबाहेर निघून जाण्यास सांगत मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. परिसरातील काही नागरिकांनी हस्तक्षेप करून वाद मिटविला. त्यानंतर पीडित तरुणीने थेट माहेर गाठत पोलिसांकडे धाव घेतली.
आकर्षण आणि वास्तव यातील अंतर
या घटनेने प्रेमविवाहाच्या नावाखाली घाईघाईने घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ आकर्षणाला प्रेम समजून कुटुंबीयांचा विचार न करता उचललेले पाऊल आयुष्यभराची वेदना ठरू शकते, अशी भावना परिसरात व्यक्त होत आहे. मुलीच्या सुखासाठी आयुष्यभर झटणाऱ्या आई-वडिलांचा सल्ला आणि अनुभव अनेकदा अशा प्रसंगी दुर्लक्षित केला जातो. मात्र वास्तवातील संघर्ष समोर आल्यानंतर अनेकांना आपल्या निर्णयाची मोठी किंमत मोजावी लागते.
दरम्यान, पोलिसांनी विवाहितेच्या तक्रारीवरून पती श्रीकृष्ण दोसतवार (२८), सासरे श्रीराम दोसतवार (६०) आणि सासूविरुद्ध मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी बीएनएसच्या कलम ११८(१), ३५१(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
"प्रेम आंधळं असू शकतं; पण आयुष्याचे निर्णय डोळसपणे घेतले तरच संसार सुखाचा होतो," अशी चर्चा या घटनेनंतर परिसरात रंगली आहे.

No comments: