Latest News

Latest News
Loading...

‘पैसे पाठवलेत’ म्हणत लाखोंचा मद्यसाठा उचलला; वणीतील मद्यविक्रेत्या पिता-पुत्रावर फसवणुकीचा गुन्हा दाखल


प्रशांत चंदनखेडे वणी :-

"आरटीजीएस केला आहे... पैसे खात्यात जमा होतील," असे सांगत विदेशी मद्याचा लाखो रुपयांचा साठा उचलण्यात आला. पुरवठादार कंपनीने विश्वास ठेवला, माल दिला; मात्र पैसे खात्यात कधीच आले नाहीत. अखेर महिनोनमहिने थकबाकीचा पाठपुरावा करूनही रक्कम न मिळाल्याने हे प्रकरण थेट आर्थिक गुन्हे शाखेपर्यंत पोहोचले आणि तब्बल ४४.३७ लाख रुपयांच्या कथित आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात वणी येथील मद्य व्यावसायिक जयस्वाल पितापुत्रावर गुन्हा नोंदविण्यात आला असून मद्य व्यवसाय क्षेत्रात या कारवाईची जोरदार चर्चा रंगली आहे.

तक्रारदार शैकी राजेंद्रकुमार जयस्वाल, संचालक, जयस्वाल स्पिरिट प्रा. लि., अकोला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्यांच्या कंपनीकडून अनेक वर्षांपासून विदेशी मद्य खरेदी करीत होते. नोव्हेंबर २०२५ मध्ये आरोपींकडे आधीच ६३ लाखांहून अधिक थकबाकी असताना त्यांनी पुन्हा मोठ्या प्रमाणात मद्याची ऑर्डर दिली.

कंपनीने थकबाकी भरल्याशिवाय माल देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींकडून आरटीजीएसद्वारे रक्कम पाठविल्याचे सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून कंपनीने १६.६७ लाख रुपयांचा विदेशी मद्यसाठा पुरविला. मात्र संबंधित रक्कम कंपनीच्या खात्यात जमा झाल्याचे आढळून आले नाही.

"माल मिळाला नसता म्हणून तसे केले"
तक्रारीनुसार, दुसऱ्या दिवशी कंपनीच्या प्रतिनिधींनी संपर्क साधून विचारणा केली असता आरोपींनी कथितपणे, "तसं केलं नसतं तर तुम्ही आम्हाला माल दिला नसता," अशी कबुली दिल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर काही रक्कम परत करण्यात आली; मात्र आजही लाखो रुपयांची थकबाकी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेची एंट्री
व्यवहारातील कथित फसवणूक, खोटी आश्वासने आणि विश्वासघाताच्या आरोपांची गंभीर दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर खदान (अकोला) पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(४) व ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

मद्य व्यवसाय वर्तुळात खळबळ
विदेशी मद्याच्या व्यवहारातून उद्भवलेल्या या लाखो रुपयांच्या वादामुळे मद्य व्यावसायिक व व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. विश्वासाच्या आधारावर चालणाऱ्या व्यावसायिक व्यवहारात कथित फसवणुकीचा हा प्रकार समोर आल्याने अनेक व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले असून आर्थिक व्यवहारातील आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

No comments:

Powered by Blogger.