Latest News

Latest News
Loading...

"छोट्या शहरातून एआयची मोठी झेप; केतन पारखी घडवितोय डिजिटल क्रांती"

प्रशांत चंदनखेडे वणी :-

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना माहितीचा खजिना उपलब्ध करून देण्याचे काम वणीतील एका ध्येयवेड्या तरुणाने हाती घेतले आहे. प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत सॉफ्टवेअर इंजिनियर बनलेल्या केतन पारखी यांनी आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर वणीसह विदर्भातील नागरिकांना डिजिटल युगाशी जोडण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे.

युग बदलत आहे, तंत्रज्ञान बदलत आहे आणि माहिती मिळविण्याच्या पद्धतीही बदलत आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांनाही आधुनिक तंत्रज्ञान सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने केतन पारखी यांनी सुरुवातीला वणी सिटी डॉट कॉमसह नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती आणि महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांसाठी तब्बल ३४ डिजिटल अॅप्स विकसित केले. या अॅप्सच्या माध्यमातून नागरिकांना बातम्या, लेख, व्यावसायिक जाहिराती, खरेदी-विक्रीची माहिती आणि विविध सामाजिक विषयांवर मुक्तपणे व्यक्त होण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.

या डिजिटल उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि लाखो लोक या अॅप्सशी जोडले गेले. मात्र केतन पारखी यांची वाटचाल इथेच थांबली नाही. बदलत्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करत त्यांनी आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मोठी झेप घेत ‘वणी सिटी एआय’, ‘चंद्रपूर एआय’ आणि ‘नागपूर एआय’ ही अत्याधुनिक एआय अॅप्स विकसित केली आहेत. या एआय अॅप्सला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळू लागला असून ५८ हजार लोकांनी हे अॅप्स मोबाईलमध्ये डाउनलोड केले आहेत. 

विशेष म्हणजे, या अॅप्समध्ये लोकल ब्रेकिंग न्यूज, स्थानिक रोजगार संधी, व्यावसायिक माहिती, मार्केट प्लेस, शासकीय योजनांची माहिती तसेच मराठीत कोणताही प्रश्न विचारल्यास तात्काळ उत्तर मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे एआयसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान आता सर्वसामान्यांच्या हातातील साधन बनू लागले आहे.

केतन पारखी यांचा जन्म यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांच्या सीमेवरील शैक्षणिक गुणवत्तेचा वारसा लाभलेल्या वणी शहारत झाला. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या या युवकाने कठोर परिश्रम, जिद्द आणि अभ्यासाच्या जोरावर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तंत्रज्ञानाच्या प्रत्येक बदलत्या पैलूचा अभ्यास करत त्यांनी नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन डिजिटल सेवा विकसित करण्यावर भर दिला.

मोठे यश मिळविण्यासाठी मोठ्या शहरातच जन्म घ्यावा लागतो, ही सर्वसामान्य धारणा केतन पारखी यांनी खोटी ठरवली आहे. छोट्या तालुक्यात राहूनही जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानावर काम करता येते आणि समाजासाठी उपयुक्त नवकल्पना विकसित करता येतात, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.

"आपल्या जिल्ह्यातील तरुणांनीही एआयसारख्या आधुनिक तंत्रज्ञानात मोठे काम करून देशपातळीवर आपली छाप निर्माण करावी," असा संदेश केतन पारखी देतात. त्यांच्या मते, आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि डिजिटल दरी कमी झाली पाहिजे.

आज त्यांच्या एआय अॅप्सच्या माध्यमातून नागरिकांना रुग्णालये, शासकीय कार्यालये, विविध सेवा, सरकारी व खासगी नोकऱ्यांची माहिती आणि अनेक उपयुक्त बाबी घरबसल्या उपलब्ध होत आहेत. त्यामुळे वणीसारख्या छोट्या शहरातून सुरू झालेली ही डिजिटल क्रांती आता विदर्भभर विस्तारत असून, केतन पारखी यांची यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

"ध्येय मोठं असेल, तर गाव लहान असलं तरी यशाची उंची मोठी गाठता येते," हे केतन पारखी यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.

No comments:

Powered by Blogger.