Latest News

Latest News
Loading...

अवैध धंद्यांवर नव्या ठाणेदारांचा धडाका; कारवायांचे स्वागत, पण सातत्याची अपेक्षा


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेले ठाणेदार भानुदास पिदूरकर यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम उघडली असून मटका अड्डे, अवैध दारू विक्री आणि तस्करीवर सलग कारवाया करून अवैध व्यावसायिकांमध्ये धडकी भरविली आहे. त्यांच्या या आक्रमक कारवाईचे शहरातून स्वागत होत असले तरी या मोहिमेत सातत्य राहावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

पदभार स्वीकारल्यानंतर ठाणेदार पिदूरकर यांनी अल्पावधीतच मटका अड्ड्यांवर तब्बल सात कारवाया केल्या. त्याचबरोबर अवैध दारू विक्रेत्यांविरोधातही कारवाईचा बडगा उगारला आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईत मोटारसायकलवरून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या एका तस्कराला ताब्यात घेऊन देशी दारूसह सुमारे १ लाख ३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शहरातील अवैध व्यवसायांवर कारवाईचा सपाटा सुरू झाल्याने "नव्या ठाणेदारांचा धडाका" अशी चर्चा रंगली आहे. त्यांच्या या कारवाया केवळ पदभार स्वीकारल्याची नोंद ठरू नयेत, तर त्या पुढेही तितक्याच प्रभावीपणे सुरू राहाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, शहरासह ग्रामीण भागातही अवैध मटका अड्डे व दारू विक्रीचे जाळे वाढत असल्याची तक्रार वारंवार होत असते. शहरालगत असलेल्या गावांमध्ये खुलेआम मटका अड्डे सुरू असल्याच्या तथा अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी होत असताना या भागांमध्येही पोलीस कारवाईचा विस्तार व्हावा, अशी मागणी पुढे येत आहे.

नागरिकांच्या मते, पोलिसांकडून मटका अड्ड्यांवर कारवाई होत असली तरी काही ठिकाणी पुन्हा त्याच जागी अवैध व्यवसाय सुरू होत असल्याचे चित्र आहे. भाजी मंडई परिसरासह काही भागांतील मटका अड्ड्यांवर वारंवार कारवाया होऊनही ते पुन्हा सुरू होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कारवाईसोबतच अशा ठिकाणांवर प्रभावी नियंत्रण ठेवणेही आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

ठाणेदार पिदूरकर यांनी दाखविलेली तत्परता आणि कर्तव्यदक्षता सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. अवैध धंद्यांविरोधातील ही मोहीम केवळ सुरुवात न राहता सातत्यपूर्ण मोहिमेत रूपांतरित झाली, तर शहरातील गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा वणीकरांकडून व्यक्त होत आहे.

No comments:

Powered by Blogger.