Latest News

Latest News
Loading...

धुळ प्रदूषणाच्या विळख्यात वणी; खारगे समितीसमोर शेतकरी आणि नागरिकांचा आक्रोश


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वेकोलिच्या कोळसाखाणी, कोळसा सायडिंग आणि कोळसा वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या धूळ प्रदूषणाने वणी तालुक्यातील जनजीवन अक्षरशः वेठीस आले आहे. शेतातील पिकांचे होत असलेले नुकसान, नागरिकांच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम आणि वाढत्या प्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र राज्य महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव तथा वेकोलि प्रदूषण नियंत्रण समितीचे अध्यक्ष विकास खारगे यांनी वणी तालुक्याचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र या दौऱ्यात प्रदूषणग्रस्त नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी समितीसमोर अक्षरशः समस्यांचा पाढाच वाचला.

तालुक्यातील विविध कोळसाखाणी, कोळसा वाहतुकीचे मार्ग आणि शहरालगतच्या कोळसा सायडिंगची पाहणी करताना खरगे यांनी धूळ प्रदूषणाच्या स्वरूपाची माहिती घेतली. कोळसा वाहतुकीदरम्यान रस्त्यांवर सांडणारा कोळसा, त्यापासून तयार होणारी काळी भुकटी आणि वाऱ्यामुळे शेतांपर्यंत पोहोचणारी धूळ यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी शासनाकडे पोहोचल्या होत्या. त्यानंतरच या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. विकास खारगे यांनी प्रदूषणग्रस्त गावांना भेटी देऊन समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र समितीला काही भागात नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला.
कोळसाखाणी व कोळसा सायडिंगच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर महसूल भवन येथे आयोजित बैठकीत प्रदूषणग्रस्त नागरिक, सरपंच आणि लोकप्रतिनिधींनी आपली व्यथा मांडली. खांदला गावाच्या सरपंचांनी कोळशाच्या धुळीमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असतानाही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. प्रदूषणामुळे नागरिक विविध आजारांनी ग्रस्त होत असून अनेकांचे जीवही गेले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

चिखलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचा रुपाली कातकडे यांनी गावातील कोलडेपो आणि कोळसा प्लॉटमुळे वाढणाऱ्या प्रदूषणाकडे लक्ष वेधले. रहिवासी वस्तीलगत असलेल्या या कोलडेपोंमधून उडणारी धूळ थेट घरांमध्ये शिरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे कोलडेपो गावाबाहेर हलविण्याची मागणीही त्यांनी समितीपुढे केली. आणि तसे निवेदनही सादर केले. 
दरम्यान, नगरसेवक अजय धोबे यांनी शहरालगतच्या कोळसा सायडिंगचा प्रश्न आक्रमकपणे मांडला. सायडिंगमधून उडणाऱ्या धुळीमुळे परिसर कायम काळवंडलेला दिसतो, नागरिकांना त्वचारोग, दमा आणि हृदयविकारासारखे आजार जडत आहेत, असा दावा त्यांनी केला. अनेक आंदोलने आणि आश्वासने मिळूनही सायडिंग स्थलांतराचा प्रश्न प्रलंबित असल्याची खंत व्यक्त करत, तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

मात्र या दौऱ्याबाबत एक वेगळीच चर्चा रंगली. प्रदूषणाची सर्वाधिक तीव्रता असते ती हिवाळा आणि उन्हाळ्याचा कालावधीत. त्या काळात शेतातील पिके काळ्या धुळीने झाकली जातात. सध्या पावसाळ्याच्या सुरुवातीमुळे धूळ उडण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने प्रदूषणाचे वास्तविक चित्र समितीसमोर कितपत आले, याबाबतही शंका व्यक्त करण्यात आली.

एकूणच, वणीतील प्रदूषणाचा प्रश्न आता केवळ पर्यावरणाचा राहिलेला नसून तो शेती, आरोग्य आणि जनजीवनाशी निगडित गंभीर विषय बनला आहे. त्यामुळे विकास खरगे यांच्या पाहणी अहवालातून नेमक्या कोणत्या उपाययोजना सुचवल्या जातात आणि वेकोलिवर कोणती जबाबदारी निश्चित केली जाते, याकडे आता संपूर्ण वणी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.