Latest News

Latest News
Loading...

दारू तस्करांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; अवैध दारू वाहतुकीचा डाव उधळला, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील अवैध दारू व्यवसायाला पोलिसांनी पुन्हा एकदा जबर हादरा दिला आहे. गुप्त माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत वणी पोलिसांनी काही मिनिटांच्या अंतराने दोन ठिकाणी धाड टाकत अवैध दारू वाहतुकीचे प्रयत्न हाणून पाडले. या कारवाईत चारचाकी वाहन, मोपेड आणि दारूसाठ्यासह तब्बल 20 लाख 13 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरात अवैध दारूची साखळी पुन्हा सक्रिय होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांनी पोलीस पथकाला सतर्कतेचे आदेश दिले होते. सोमवारी सकाळी दीपक चौपाटी परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना एकाच वेळी चारचाकी आणि दुचाकीच्या माध्यमातून अवैधरित्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय व तेवढीच खात्रीशीर माहिती मिळाली.

माहितीची शहानिशा होताच पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून संशयित वाहनांचा शोध सुरू केला. दरम्यान पोलिसांना घुग्घूस रोडवर एक कार संशयास्पदरीत्या फिरतांना दिसली. पोलिसांनी एमएच-42 बीई-9395 क्रमांकाची कार थांबवून तपासणी केली असता या आलिशान कारमध्ये विविध कंपन्यांच्या दारूचा मोठा साठा आढळून आला.  पोलिसांनी कार चालकाकडे दारू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. वाहन चालक भारत प्रमोद टोंगे (रा. शिंदोला) याच्याकडे दारू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी दारूच्या साठ्यासह त्याला ताब्यात घेतले. 

पहिल्या कारवाईची प्रक्रिया सुरू असतानाच पोलिसांना दोन युवक एका मोपेड दुचाकीवरून एक मोठी थैली घेऊन जातांना दिसले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ही मोपेड दुचाकी अडविली आणि थैलीची तपासणी केली. थैलीमध्येही पोलिसांना वेगवेगळ्या कंपनीच्या दारूच्या शिश्या आढळून आल्या. हे दोन्ही युवक मोपेडवरून अवैधरित्या दारूची वाहतूक करीत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी अवैध विक्रीकरिता दारूचा साठा घेऊन जाणाऱ्या सुमित उद्धव झुंगे (19) व शुभम अनंता वाघमारे, दोघेही रा. लालगुडा (वणी) यांच्या जवळून ६ हजार २४० रुपये किमतीची दारू व मोपेड दुचाकी (MH २९ BB ०३०८) असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

या दोन्ही कारवायांमध्ये चारचाकी वाहन, मोपेड आणि दारूसाठा असा एकूण 20 लाख 13 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ठाणेदार भानुदास पिदुरकर यांनी वणी पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा सपाटा लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू, अमली पदार्थ आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांविरोधात पोलिसांनी आक्रमक मोहीम उघडली आहे.  या सातत्यपूर्ण व सलग सुरू असलेल्या कारवायांमुळे दारू तस्कर, मटका व्यावसायिक आणि इतर अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार भाऊदास पिदूरकर, पोउपनि साजिद सैय्यद, पोहेका गजानन सावसाकडे, मारोती पाटील, पोका पुरुषोत्तम डडमल, रितेश भोयर, मोनेश्वर खंडरे, नंदकुमार पुप्पलवार, माधव दहिकांबळे आणि गजानन कुळमथे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली

No comments:

Powered by Blogger.