अखेर उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने मंगळवारी मध्यरात्री दमदार हजेरी लावत वणीकरांना पावसाचा खरा अनुभव दिला. रात्री एक वाजता नंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. काही भागांत घरांमध्ये पाणी शिरले, रस्त्यांवरून नदी नाल्यांप्रमाणे पाण्याचे प्रवाह वाहू लागले आणि नागरिकांची मध्यरात्रीच तारांबळ उडाली. मात्र याच पावसाने पेरणीच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलवले.
यंदा मान्सूनचे आगमन लांबल्याने मृग नक्षत्राचा अर्धा महिना उलटून गेला तरी समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शेतातील पेरण्या खोळंबल्या होत्या. नागरिकही उकाड्याने हैराण झाले होते. अधूनमधून पडणाऱ्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण होत नव्हता. त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा कायम होती. शेतकरी आणि नागरिक दोघेही पावसाची आतुरतेने वाट पाहत होते.
मंगळवारी दिवसभर संततधार सुरु असलेल्या पावसाने मध्यरात्रीनंतर अचानक रौद्र रूप धारण केले. आकाशातून कोसळणाऱ्या जलधारांनी शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आणि रस्ते जलमय झाले. काही भागांत पाणी इतक्या वेगाने साचले की रस्त्यांचे रूपांतर ओढ्यांमध्ये झाल्याचे चित्र दिसून आले.
विठ्ठलवाडी परिसरात तर पावसाने थेट घरांचा दरवाजा ठोठावला. विठ्ठलवाडी परिसरातील रहिवासी विजय मोडक यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. रस्त्यावरून वाहणारे पाणी घरातील सर्व खोल्यांमध्ये आणि स्वयंपाकघरापर्यंत पोहोचल्याने कुटुंबाची एकच धावपळ उडाली. घरातील ज्येष्ठ महिलेच्या सतर्कतेमुळे ही बाब वेळीच लक्षात आली आणि संपूर्ण कुटुंब जागे झाले. गाढ झोपेत असलेल्या कुटुंबाला विजय मोडक यांच्या वृद्ध आईने जागे केले. घरभर साचलेले पाणी पाहून कुटुंबाची एकच धावपळ उडाली. घरात शिरलेल्या पाण्यामुळे आवश्यक वस्तू सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी मध्यरात्रीच कुटुंबाला झटावे लागले. घरातील साहित्य वाचविण्यासाठी मध्यरात्रीच सावरासावर सुरू झाली. घरात गुडघाभर पाणी आणि बाहेर मुसळधार पाऊस, अशा परिस्थितीत संपूर्ण कुटुंबाला रात्र जागून काढावी लागली.
दुसरीकडे, या पावसाने शेतकऱ्यांसाठी आशेची नवी पहाट उगवली आहे. अनेक दिवसांपासून पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आता शेतात उतरण्याच्या तयारीत आहेत. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने खरीप हंगामाला गती मिळणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह मजूरवर्गातही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकूणच, मध्यरात्रीच्या मुसळधार पावसाने शहरवासीयांची झोप उडविली असली, तरी त्याच पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा जागवल्या. एका रात्रीत संकट आणि समाधान या दोन्ही भावना अनुभवायला लावणारा हा मान्सूनचा पहिला खरा धडाका ठरला.

No comments: