वणी शहराच्या विकासाच्या गप्पा रंगत असताना रेल्वे स्टेशनजवळील गौरकार ले-आऊट परिसरातील २५ ते ३० वर्षे जुनी घाणपाणी वाहून नेणारी नाली मात्र आजही नगर पालिकेच्या उदासीनतेची साक्ष देत आहे. जागोजागी दुभंगलेली, तुंबलेली आणि आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झगडणारी ही नाली आता नागरिकांसाठी गंभीर डोकेदुखी ठरली असून घाणपाणी थेट घरांच्या आवारात शिरू लागल्याने रहिवाशांचा संताप अनावर झाला आहे.
संपूर्ण शहरात भूमिगत नाल्यांचे जाळे उभारण्यात आले, विविध विकासकामांवर कोट्यवधींचा निधी खर्च झाला; मात्र गौरकार ले-आऊट परिसर विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कायमच दूर राहिला. अनेक नगरसेवक आले-गेले, अनेक विकास आराखडे तयार झाले; पण या नालीच्या पुनर्बांधणीचा प्रश्न मात्र कायम धुळखात पडून राहिला.
सध्या नालीची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, सांडपाणी वाहून नेण्याची तिची क्षमता संपुष्टात आली आहे. अनेक ठिकाणी नाली फुटली व सिमेंट पाईप तुटले असून नालीचा प्रवाह अडथळ्यांमुळे बंद झाला आहे. परिणामी नालीचे घाणपाणी उलट दिशेने वाहत नागरिकांच्या घरांमध्ये घुसू लागले आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानंतर अरुण कुळसंगे यांच्या घराच्या आवारात नालीचे पाणी साचल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली. कुटुंबाचे घराबाहेर निघणेही कठीण झाले होते.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत वारंवार नगरसेवक आणि नगर पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मुख्याधिकाऱ्यांनी काही काळ या नालीच्या पुनर्बांधणीसाठी हालचालीही सुरू केल्या होत्या. अंदाजपत्रक तयार करण्यासाठी पाहणीही झाली; मात्र त्यानंतर हा विषय पुन्हा थंडबस्त्यात गेला.
दरम्यान, परिसरातील नागरिक नगरसेवकांच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त करत आहेत. समस्या मांडल्यानंतरही केवळ आश्वासने मिळतात, प्रत्यक्ष उपाययोजना होत नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. नगर पालिका प्रशासन आमचे ऐकतच नाही, अशी लाचार उत्तरं नगर सेवकांकडून मिळतात. प्रभागाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना लोकांनी नगर पालिकेवर पाठविले. मात्र ते समस्या दूर करण्याऐवजी थातुर मातुर उत्तरे देऊन नागरिकांचा संताप वाढत आहेत. निव्वळ नगर सेवक म्हणून मिरवण्यात व भाषणे ठोकण्यातच ते धन्यता मानत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आता नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत. प्रभागात फिरून समस्या व नागरिकांचे प्रश्न ऐकून घेण्याची त्यांची मानसिकताच दिसत नाही. काही दिवसांपूर्वी परिसरात निर्माण झालेला पाणीपुरवठ्याचा प्रश्नही येथील नागरिकांनाच पुढाकार घेऊन सोडवावा लागला होता, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होतांना दिसत आहेत.
गौरकार ले-आऊट परिसरात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून उघड्या नाल्या, वाढलेली झाडेझुडपे आणि साचलेले घाणपाणी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच परिसरात यापूर्वी डेंग्यूसारख्या आजारांचे रुग्ण आढळून आले होते. तरीही नगर पालिका प्रशासनाने या भागाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
"शहर सुशोभीकरणाच्या घोषणा एकीकडे आणि दुसरीकडे घाणपाण्यात जगणारे नागरिक," अशी परिस्थिती गौरकार ले-आऊटमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे ही जीर्ण नाली तातडीने भूमिगत करून परिसराला मूलभूत सुविधांचा हक्क मिळवून द्यावा, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे.



No comments: