प्रशांत चंदनखेडे वणी :-
पहिला पाऊस हा केवळ ऋतूचा प्रारंभ नसतो; तो मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेल्या असंख्य आठवणींचा दरवाजा उघडणारा एक हळवा स्पर्श असतो. उन्हाच्या काहिलीने होरपळलेल्या धरतीवर जेव्हा पहिला थेंब अलगद पडतो, तेव्हा फक्त मातीच सुगंधित होत नाही, तर मनातही भावनांचा एक दरवळ पसरतो. कित्येक दिवसांनी भेटलेल्या जिवलग मित्रासारखा पाऊस मनाशी संवाद साधतो आणि नकळत आपल्याला भूतकाळाच्या त्या सुंदर पायवाटांवर घेऊन जातो.
पावसाळा म्हणजे फक्त पाणी नव्हे, तर तो आठवणींचा एक अखंड झरा असतो. बालपणी पावसाची पहिली सर बरसली की घराबाहेर धाव घेण्याची ओढ असायची. आभाळातून कोसळणाऱ्या सरी हातावर झेलताना जणू स्वर्गच मुठीत पकडल्याचा भास व्हायचा. रस्त्यांवरून खळखळ वाहणाऱ्या पाण्यात अनवाणी पायांनी चालताना मिळणारा आनंद शब्दांत मांडणे अशक्य आहे. चिखलाने माखलेले पाय, अंगभर उडालेले पाण्याचे थेंब आणि चेहऱ्यावर खुललेले निष्पाप हास्य... हाच तर खरा पावसाळा होता.
त्या काळात पाऊस पडला की संपूर्ण परिसर नव्याने जन्म घेत असल्यासारखा वाटायचा. झाडांच्या पानांवर थांबलेले मोत्यांसारखे थेंब, हिरव्या गवतावर पसरलेली दवबिंदूंची चादर आणि दऱ्याखोऱ्यांतून वाहणारे पाण्याचे प्रवाह निसर्गाला एका नव्या सौंदर्याने सजवत असत. प्रत्येक वाट हिरवीगार व्हायची, प्रत्येक शेत बहरून यायचं आणि प्रत्येक मन प्रसन्न व्हायचं.
त्या दिवसांची गंमतच वेगळी होती. पाऊस सुरू झाला की शाळेत जाण्यासाठी छत्री नव्हती, रेनकोट नव्हते. डोक्यावर तांदळाचे पोते किंवा मोठा प्लास्टिकचा तुकडा घेऊनच शाळेचा प्रवास व्हायचा. पायवाटांवरचा चिखल तुडवत, खड्ड्यांत साचलेल्या पाण्यातून उड्या मारत शाळेकडे जाण्यात एक वेगळं सुख होतं. शाळेच्या कवेलूच्या छपरातून गळणारे थेंब आणि वर्गात बसून पावसाचा आवाज ऐकण्याची मजा आजच्या वातानुकूलित वर्गखोल्यांना कधीच समजणार नाही.
कधीकधी पाऊस इतका कोसळायचा की मास्तरही हार मानायचे आणि शाळेला सुटी जाहीर व्हायची. मग सगळे मित्र आनंदाने ओरडत घरी निघायचे. घरी पोहोचेपर्यंत अंगावरील प्रत्येक कपडा चिंब झालेला असायचा, पण मन मात्र आनंदाने फुललेलं असायचं.
आजच्या पिढीला कदाचित हे सारे अनुभव कल्पनेतही बसणार नाहीत. कारण आता पावसापासून बचाव करण्याची साधने वाढली आहेत, पण पावसात भिजण्याची हौस कमी झाली आहे. सिमेंटचे रस्ते आले, पायवाटा हरवल्या. हिरव्यागार झाडांची जागा काँक्रीटच्या जंगलांनी घेतली. पावसाच्या सरी आजही तशाच कोसळतात, पण त्यांचा आनंद घेणारी मनं बदलली आहेत.
काही आठवणी मात्र काळाच्या ओघातही पुसल्या जात नाहीत. रेल्वे स्टेशन परिसरातील तो जुना पूल आज अस्तित्वात नसला तरी पावसाची झड लागली की त्याची आठवण नकळत डोळ्यांसमोर उभी राहते. तुडुंब भरलेलं पाणी, पुलावरून वाहणारा वेगवान प्रवाह आणि ते दृश्य पाहण्यासाठी जमलेली गर्दी... हे सारे आता इतिहासजमा झाले आहे. पूल गेला, परिसर बदलला; पण त्या आठवणी अजूनही मनात ताज्याच आहेत.
पावसाचा रौद्र अवतारही तेवढाच जवळून अनुभवला आहे. मुसळधार पाऊस अनेकदा इतका कोसळायचा की रेल्वे क्वार्टरमध्ये अक्षरशः माणूसभर पाणी शिरायचं. घरातलं सामान उंचावर ठेवण्याची धावपळ उडायची. लहान मुलांच्या डोळ्यांत भीती असायची, तर मोठ्यांच्या चेहऱ्यावर काळजी. अशा वेळी क्वार्टरमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना रात्री-अपरात्री रेल्वे स्टेशनमध्ये आसरा घ्यावा लागायचा. त्या ओल्या रात्री, स्टेशनच्या बाकांवर काढलेले क्षण आणि बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज आजही स्मरणात तितकाच जिवंत आहे. संकट असलं तरी त्या दिवसांमध्येही एक वेगळाच जिव्हाळा होता. एकमेकांना आधार देणारी माणसं होती आणि दुःखातही आनंद शोधण्याची ताकद होती.
पावसाळा हा खरंतर निसर्गाचं प्रेमपत्र असतो. तो प्रत्येकाच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या रूपाने येतो. कुणासाठी तो बालपणाच्या आठवणी घेऊन येतो, कुणासाठी पहिल्या प्रेमाचा गंध, तर कुणासाठी हरवलेल्या क्षणांचा हळवा स्पर्श. म्हणूनच पाऊस पडू लागला की मन नकळत भूतकाळात हरवून जातं.
आजही पावसाची पहिली सर बरसली आणि थंड वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्शून गेली की, मन पुन्हा त्या जुन्या दिवसांत पोहोचतं. ते बालपण, ते सवंगडी, ती हुल्लडबाजी, ती निरागसता आणि कुणाच्या तरी आठवणीत अलगद भिजलेलं मन...
कारण काही ऋतू संपतात, काही दिवस निघून जातात, काही माणसं दूर जातात; पण पावसाच्या सरींमध्ये भिजलेल्या आठवणी मात्र आयुष्यभर आपल्या मनाच्या मातीला ओलावा देत राहतात.
"तू आलीस सरींसारखी... आणि मीही मनसोक्त भिजलो. पाऊस थांबला, ऋतू बदलले; पण त्या ओल्या आठवणी अजूनही मनाच्या अंगणात रिमझिम बरसत आहेत..." 🌧️🍃✍️

No comments: