Latest News

Latest News
Loading...

अनोळखी मृतदेहाच्या गूढामागे निघाला सूडाचा रक्तरंजित कट; मारेगाव पोलिसांनी २४ तासांत उलगडले हत्याकांड


प्रशांत चंदनखेडे वणी :-

मारेगाव तालुक्यातील मार्डा डॅमलगतच्या जंगलात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाचं रहस्य उलगडलं असून त्याचा तीन जणांनी मिळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मार्डा डॅम जंगल शिवारात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्यानंतर या रहस्यमय प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावत मारेगाव पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. बहिणीला वारंवार त्रास देत असल्याच्या रागातून तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह जंगलातील खड्यात फेकण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. या थरारक खून प्रकरणाचा वेगाने उलगडा केल्याबद्दल मारेगाव पोलिसांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ५ जून रोजी दांडगाव शिवारातील मार्डा डॅम परिसरात गौतम ठमके यांच्या शेतालगतच्या जंगलातील खड्यात एका अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फॉरेन्सिक पथक, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वानपथकाच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली.

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटविणे मोठे आव्हान होते. मात्र पोलिसांनी विविध दिशांनी तपास सुरू ठेवला. तीन स्वतंत्र तपास पथके तयार करून शोधमोहीम राबविण्यात आली. तपासादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील नागरी गावात मृत व्यक्तीची ओळख विनोद प्रल्हादराव सहारे (३५, रा. मरेगाव, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) अशी पटली.

ओळख पटताच तपासाला निर्णायक वळण मिळाले. दरम्यान, शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मनवर यांच्या पथकाने आरोपीचा शोध लावून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या तपासानुसार, मृत विनोद सहारे हा आरोपी प्रविण वरधने याच्या बहिणीला वारंवार त्रास देत होता. याच रागातून आरोपींनी कट रचला. ३ जून रोजी विनोदला वरोरा रेल्वे स्थानकातून मोटारसायकलवर बसवून मार्डा डॅम परिसरात नेण्यात आले. तेथे तिघांनी संगनमताने त्याची हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलातील खड्यात फेकून दिला.

या प्रकरणी पोलिसांनी प्रविण अशोक वरधने (३५, रा. आपटी ता. मारेगाव), राजू नथ्थुजी ढेंगळे (३५, रा. दांडगाव ता. मारेगाव) आणि शंतनू झाडे (१८, रा. नागरी, ता. वरोरा) यांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुजलेल्या मृतदेहापासून आरोपींपर्यंत... तपासाचा थरार
या प्रकरणात सर्वात मोठे आव्हान होते ते मृतदेहाची ओळख पटविण्याचे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने तपास अंधारात चाचपडत होता. मात्र पोलिसांनी मृताच्या हातातील कडे, वापरातील वस्तू आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासाची साखळी जोडली. अखेर आरोपींपर्यंत पोहोचत संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा करण्यात यश आले.

२४ तासांत गूढ उलगडून पोलिसांची दमदार कामगिरी
या सनसनाटी खून प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद जिद्देवार, सहायक फौजदार दिगंबर किनाके, पोलीस शिपाई सागर दीपेवार, राजन इसनकर तसेच शिरपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, पोलीस हवालदार इकबाल शेख आणि अजय वाभिटकर यांनी संयुक्तरीत्या उल्लेखनीय कामगिरी बजावली.

जंगलातील अनोळखी मृतदेहापासून सुरू झालेला तपास अखेर सूड, संगनमत आणि रक्तरंजित हत्येपर्यंत पोहोचला; आणि पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांनी कितीही शक्कल लढवली तरी कायद्याच्या हातातून सुटका नसल्याचे दाखवून दिले.

No comments:

Powered by Blogger.