Latest News

Latest News
Loading...

‘कॉक्रोच’ म्हणून हिणवलं... अन् देशभर उभा राहिला युवकांचा लढा!


प्रशांत चंदनखेडे नागपूर :-

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान तरुणांना "कॉक्रोच" अशी उपमा दिल्यानंतर देशभरात निर्माण झालेल्या संतापातून जन्माला आलेली कॉक्रोच जनता पार्टी (सीजीपी) आता युवकांच्या असंतोषाचा नवा चेहरा बनू लागली आहे. अवघ्या काही दिवसांत कोट्यवधी युवक सोशल मीडियाच्या माध्यमातून या चळवळीशी जोडले गेले असून, पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदीविरोधात सीजीपीने देशव्यापी संघर्षाचे रणशिंग फुंकले आहे.

याच पार्श्वभूमीवर मंगळवारी नागपूरच्या संविधान चौकात झालेल्या आंदोलनाने युवकांच्या संतापाला नवा आवाज दिला. हजारोंच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा आक्रमकपणे लावून धरली गेली.
अमेरिकेहून परतताच आंदोलनाची धुरा
सीजीपीचे संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर पक्षाची पहिली रणनीती ठरली ती म्हणजे नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. त्यानंतर दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनाची सुरुवात झाली. पुढे लखनऊ, बेंगळुरू, अमृतसर, जयपूर अशा शहरांमध्ये आंदोलनांची मालिका राबविण्यात आली. नागपूरमधील आंदोलन हे त्याच देशव्यापी अभियानाचा भाग ठरले.
संविधान चौकात युवकांचा महासागर
सायंकाळी चार वाजल्यापासून संविधान चौकात युवकांची गर्दी वाढू लागली. अभिजित दीपके आंदोलनस्थळी पोहोचताच वातावरणात उत्साह संचारला. भारत माता, संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषांनी परिसर दणाणून गेला. युवकांच्या हातात संविधानाच्या प्रती, फलक आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा मागणारे संदेश झळकत होते.

‘पेपरफुटीने स्वप्नांची राखरांगोळी’
आंदोलनाला संबोधित करताना दीपके यांनी स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार, वाढती बेरोजगारी आणि शिक्षण क्षेत्रातील अस्थिरतेवर सरकारला लक्ष्य केले. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेत असताना पेपरफुटीसारख्या घटनांमुळे त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

"देशातील तरुणांना रोजगार, शिक्षण आणि संधी हवी आहे; मात्र त्यांना धार्मिक आणि जातीय वादांमध्ये अडकवण्याचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असताना जबाबदार मंत्री राजीनामा देण्यास तयार नाहीत," असा घणाघात त्यांनी केला.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांवरून सरकारवर हल्लाबोल
नीट आणि इतर परीक्षांतील गोंधळामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत सरकारने अपेक्षित संवेदनशीलता दाखविली नसल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

‘राजीनामा मिळेपर्यंत लढा सुरूच’
संविधान चौकातील आंदोलनादरम्यान अभिजित दीपके यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, "धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हा लढा थांबणार नाही." २० जूनपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
मान्यवरांची उपस्थिती
या आंदोलनात वर्धा फिनिक्स अकादमीचे संचालक नितेश कराळे, प्रबोधनकार सत्यपाल महाराज, बेधुंदकार गोविंद पोलाड यांच्यासह कॉक्रोच जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध वक्त्यांनी आपल्या भाषणातून शिक्षण, रोजगार आणि युवकांच्या प्रश्नांवर सरकारला लक्ष्य करत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

युवकांच्या नव्या राजकीय अस्मितेची चाहूल?
अवघ्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सुरू झालेली "कॉक्रोच" ही ओळख आता संघटित युवक चळवळीत रूपांतरित होताना दिसत आहे. नागपूरच्या संविधान चौकात उसळलेली गर्दी आणि आंदोलनातील युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता, शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नांवर केंद्रित असलेल्या या नव्या चळवळीची चर्चा आता राजकीय वर्तुळातही सुरू झाली आहे.

"कॉक्रोच म्हणून हिणविलेल्या तरुणांनीच आता व्यवस्थेला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे," अशी भावना आंदोलनस्थळी अनेक युवकांच्या प्रतिक्रिया ऐकताना उमटत होती.

No comments:

Powered by Blogger.