प्रशांत चंदनखेडे वणी :-
राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन डॉक्टरांच्या कथित बेजबाबदार कारभाराविरोधात गावकऱ्यांनी सातत्याने आवाज उठविला, वरिष्ठांकडे तक्रारी केल्या, वृत्तमाध्यमांनीही हे प्रकरण चव्हाट्यावर आणले, जिल्हा आरोग्य प्रशासनाने चौकशी समिती नेमली; मात्र इतक्या घडामोडींनंतरही संबंधित डॉक्टरांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने राजूर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. चौकशी झाली, अहवाल तयार झाला की नाही, झाला असेल तर त्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत प्रशासनाकडून अद्याप मौन बाळगण्यात आल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. डॉक्टरांच्या अनुपस्थितीत रुग्णालयातील कर्मचारीच रुग्णांचा आजार जाणून घेत औषधे देत असल्याचे या व्हिडिओत दिसून आले होते. डॉक्टरांच्या प्रतीक्षेत रुग्ण तासन्तास बसून राहिले; मात्र डॉक्टर रुग्णालयात पोहोचलेच नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी संबंधित डॉक्टरांविरोधात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित डॉक्टरांचा रुग्णालयात येण्याचा कोणताही निश्चित वेळ नसून ते अनेकदा गैरहजर राहतात. मुख्यालयी राहण्याची सुविधा उपलब्ध असतानाही ते बाहेरून ये-जा करतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी रुग्णालय अक्षरशः कर्मचाऱ्यांच्या भरोशावर राहत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
रात्री डॉक्टर नसल्याने रुग्णांची फरफट
राजूर परिसरात कोळसा उद्योग, कोल डेपो, चुना भट्ट्या आणि विटा भट्ट्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. अपघात, अचानक आजारपण किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रातून तातडीची वैद्यकीय मदत मिळणे अपेक्षित असते. मात्र रात्री रुग्णालयात डॉक्टरच उपस्थित राहत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना थेट वणी ग्रामीण रुग्णालय गाठावे लागते. वेळेत उपचार न मिळाल्यास जीवितहानीची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
चौकशी समितीचा अहवाल ‘गुप्त’ का?
गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हा आरोग्य प्रशासनाने चौकशी समिती नेमून परिस्थितीची पाहणी केली होती. मात्र समितीचा अहवाल काय आला, त्यात कोणते निष्कर्ष नोंदविण्यात आले आणि त्यानुसार कोणती शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. परिणामी, हे संपूर्ण प्रकरण जाणीवपूर्वक थंडबस्त्यात टाकण्यात आले की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे.
‘वर्गणी’ची कुजबुज; गावकऱ्यांमध्ये संशय
दरम्यान, या प्रकरणाला सातत्याने वाचा फोडणाऱ्या काही व्यक्तींची तोंडे ‘वर्गणी’च्या माध्यमातून बंद करण्यात आल्याची कुजबुज राजूर परिसरात सुरू झाली आहे. रुग्णालयीन वर्तुळातही अशाच चर्चा रंगत असल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. या चर्चांना कोणताही अधिकृत आधार नसला तरी कारवाईच्या अभावामुळे नागरिकांमध्ये संशय बळावत आहे.
गावकऱ्यांचा इशारा
"रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम प्रशासनाने करू नये. चौकशी अहवाल जाहीर करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा पुन्हा जिल्हा आरोग्य प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे धाव घेऊ," असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांविरोधातील तक्रारी, त्यानंतरची चौकशी आणि तरीही झालेली शून्य कारवाई यामुळे आता एकच प्रश्न उपस्थित होत आहे—रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर तक्रारींकडे प्रशासन दुर्लक्ष का करत आहे? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, चौकशी समितीचा अहवाल नेमका कुठे आहे?

No comments: