देशभरात पेपरफुटी, वाढती बेरोजगारी आणि शिक्षण क्षेत्रातील वाढत्या खाजगीकरणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला वणीतील युवकांनीही जोरदार पाठिंबा दर्शविला. दिल्लीतील जंतरमंतरवर अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ युवाशक्ती क्रांतिकारी संघटनेच्या वतीने शनिवारी टिळक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शांतीपूर्ण आंदोलन करण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेड, एआयएसएफ (AISF), विविध स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, वाचनालयातील अभ्यासक तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच शिक्षणाचे वाढते खाजगीकरण थांबविणे, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, दिल्लीतील जंतरमंतरवर 20 जूनपासून सुरू झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर वणीतील युवकांनीही या आंदोलनाशी एकजूट दर्शवित स्थानिक स्तरावर समर्थन आंदोलन उभारले.
युवाशक्ती क्रांतिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, युवक, विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षार्थी यांच्या प्रश्नांकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक आयुष्य धोक्यात आले असून याविरोधात देशव्यापी जनआंदोलन उभे राहत आहे.
आंदोलनात सहभागी युवकांनी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, परीक्षांमधील गैरप्रकार आणि रोजगाराच्या घटत्या संधींबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
युवाशक्ती क्रांतिकारी संघटनेने केंद्र सरकारला विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांची तात्काळ दखल घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास वणी तालुक्यासह संपूर्ण परिसरात लोकशाही मार्गाने अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
दिल्लीतील आंदोलनाला वणीतून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा युवकांच्या वाढत्या असंतोषाचा आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी एकवटलेल्या संघर्षाचा प्रतीक मानला जात आहे.


No comments: