प्रशांत चंदनखेडे वणी : -
शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीवर प्रहार करत वणी पोलिसांनी एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ विक्री करणाऱ्या आणखी एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत एका आरोपीकडून 19.27 ग्रॅम एमडी पावडरसह एकूण 1 लाख 49 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या अवैध साखळीला मोठा धक्का बसला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या निर्देशानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत वणी पोलिसांना मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे शुक्रवारी (दि. 19) रात्री 9.45 वाजताच्या सुमारास गणेशपूर रोड परिसरात सापळा रचण्यात आला.
पोलीस पथकाने कौतुक उर्फ गोलू दिलीप मेश्राम (वय 28, रा. तेलीफैल, वणी) या संशयिताला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ 19.27 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून एमडी ड्रग्ज किंमत 1 लाख 34 हजार 890 रुपये आणि मोबाईल फोन किंमत १५ हजार रुपये असा एकूण १ लाख ४९ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चौकशीदरम्यान कौतुक मेश्राम याने हा अमली पदार्थ प्रज्योत उर्फ कॉकरोच महेश उपरे (रा. तेलीफैल, वणी, सध्या नागपूर) याच्याकडून आणल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
जुन्या प्रकरणातील आणखी तिघे अटकेत
दरम्यान, वणी पोलीस ठाण्यात यापूर्वी दाखल असलेल्या एमडी ड्रग्ज विक्री प्रकरणाच्या तपासातही पोलिसांना यश मिळाले आहे. या गुन्ह्यातील आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रज्योत महेश उपरे (27), अविनाश विजय पाटील (42) आणि रविंद्र धनराज गुप्ता (34) यांचा समावेश आहे.
पोलिसांकडून या रॅकेटचे नागपूरसह इतर शहरांशी असलेले संभाव्य संबंध तपासले जात असून अमली पदार्थ पुरवठा साखळीचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
एमडी किंवा इतर कोणत्याही अमली पदार्थांच्या विक्री, वाहतूक अथवा साठवणुकीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवावे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वणी पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल आणि ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि साजिद सय्यद, सुयोग महापुरे तसेच पोलिसांच्या विशेष पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

No comments: