प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी शहरातील जत्रा मैदान परिसरात एका सुरक्षा रक्षकाला रात्रीच्या अंधारात गाठून काठीने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात वाढत्या गुंडगिरीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, या प्रकरणी वणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवि राजेश घुगरे (वय ३१, रा. रामपुरा वॉर्ड, वणी) हे अकोला को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी (१४ जुलै) रात्री ड्युटी आटोपून ते बहिणीकडे जेवण करून घरी परतत असताना जत्रा मैदान परिसरात आकाश (रा. मैलगडा) व त्याचा एक साथीदार यांनी त्यांना अडविले.
सुरुवातीला मोटारसायकलवर बसण्याचा आग्रह करण्यात आला. मात्र, त्यांनी नकार देताच आरोपींनी संतापाच्या भरात हातातील लाकडी काठीने त्यांच्या चेहऱ्यावर व पायावर वार केले. त्यानंतर ठोसे मारून त्यांना गंभीर जखमी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात त्यांच्या तोंडाला दुखापत होऊन रक्तस्राव झाला.
घटनेदरम्यान परिसरातील काही नागरिक व मित्र धावत आल्याने आरोपींचा पुढील हल्ला टळला. मात्र, निघताना आरोपींनी "पोलिसांत तक्रार दिलीस तर जिवंत ठेवणार नाही," अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केल्याचा आरोप आहे.
जखमी सुरक्षा रक्षकावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांनी वणी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध बीएनएसच्या कलम ११८(१), ११५(२), ३(५), ३५१(२)(३) नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
शहरातील सार्वजनिक ठिकाणी भररस्त्यात घडलेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सराईत गुंडांच्या वाढत्या दादागिरीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments: