शिवणी–मुंगोली या जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक रस्त्याचे अस्तित्वच वेकोलि (WCL) प्रशासनाने संपविल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. रस्ता खोदून त्याजागी मोठा नाला तयार करण्यात आल्यामुळे नागरिकांच्या दळणवळणासह संपूर्ण शिवणी परिसराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे.
मनसेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद उपविभागीय अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आले. दोन दिवसांत रस्ता पूर्ववत न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
निवेदनानुसार, अनेक वर्षांपासून शेतकरी आणि नागरिकांच्या दैनंदिन वापरातील शिवणी–मुंगोली (इ. २४३) हा सार्वजनिक रस्ता वेकोलिने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबविता बंद केला. एवढेच नव्हे, तर रस्त्याच्या जागी नाला खोदल्याने पावसाळ्यात नदीचे पाणी गावाकडे वळून पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
या गंभीर प्रकारानंतरही जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने मनसेने संताप व्यक्त केला आहे. सार्वजनिक रस्ता नष्ट होत असताना प्रशासनाची निष्क्रियता संशयास्पद असल्याचा आरोप करत संबंधित शासकीय अधिकारी आणि वेकोलिच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
रस्ता तातडीने पूर्ववत करून वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल आणि त्यास जिल्हा परिषद प्रशासन व वेकोलि व्यवस्थापन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही मनसेने दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वेकोलि वणी क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक यांना आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदन देतेवेळी फाल्गुन गोहोकार यांच्यासह धीरज पिदूरकर, रणजित बोन्डे, मारोती बोटपेले, महेश कुचणकर, सचिन बोरडे, भोला चिकनकर, सुरज काकडे, अनिल वासेकार, धीरज बगवा, प्रदीप बदकल, मंगेश येटे, राहुल काळे, उत्तम इसनकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments: