प्रशांत चंदनखेडे वणी :-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, वणी शहरच्या वतीने बुधवार, २२ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजोपयोगी उपक्रमातून गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासाठी २०० रक्तपिशव्या संकलित करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
वरोरा रोडवरील बाजोरिया हॉल येथे सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हे रक्तदान शिबिर होणार असून, शहरातील नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी केले आहे.
रक्तदान हे सर्वोच्च सामाजिक दान मानले जाते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, थॅलेसेमिया व इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक जाणिवेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
रक्तदानासाठी येणाऱ्या प्रत्येक दात्याचा आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक रक्तदात्याने आपल्या मित्र-परिवार, नातेवाईक आणि इतर इच्छुक नागरिकांनाही या उपक्रमात सहभागी करून रक्तदानाचा संदेश अधिक व्यापक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम रक्तपेढीतील रक्तसाठा वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments: