चंद्रपूर–मुकुटबन बससेवेसाठी आमदार संजय देरकर यांचा पुढाकार; आगार व्यवस्थापकांना पत्र, दोन फेऱ्या सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर ते मुकुटबन या मार्गावर नियमित एसटी बससेवा सुरू करून दिवसातून किमान दोन फेऱ्या चालविण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर आगार व्यवस्थापकांकडे अधिकृत पत्राद्वारे केली आहे. या मार्गावर बससेवा नसल्याने विद्यार्थी, शेतकरी, कामगार, नोकरदार तसेच सर्वसामान्य प्रवाशांना दररोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
आमदार देरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, चंद्रपूर–मुकुटबन मार्ग हा ग्रामीण व निमशहरी भागाला जोडणारा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. मात्र, नियमित बससेवेअभावी नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून त्यासाठी अतिरिक्त आर्थिक खर्चही सहन करावा लागत आहे. वेळेवर वाहतूक उपलब्ध होत नसल्याने शिक्षण, रोजगार आणि दैनंदिन कामांवर परिणाम होत आहे.
ही बससेवा सुरू झाल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होण्यासोबतच महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी दोन संभाव्य मार्गही सुचविले आहेत. पहिल्या मार्गानुसार चंद्रपूर–घुगुस–साखरा–शिंदोला–आंभई फाटा–शेळबाळ–मोहादा–कृष्णानपूर–नेरड–पुरड–मुकुटबन, तर दुसऱ्या पर्यायी मार्गानुसार चंद्रपूर–घुगुस–चारगाव चौकी–वढगाव–१४ नंबर पूल–उमरी–कायर–नेरड–पुरड–गणेशपूर–खडकी–मुकुटबन असा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.
या दोन्ही मार्गांवर बससेवा सुरू झाल्यास हजारो प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, स्वस्त आणि सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे चंद्रपूर आगार प्रशासन या मागणीवर कितपत सकारात्मक निर्णय घेते, याकडे आता संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments: