वणी शहरातील दीपक चौपाटी परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका तरुणाला लोखंडी सळईसह ताब्यात घेत वणी पोलिसांच्या गुन्हे शोध (डीबी) पथकाने संभाव्य गुन्हा उधळून लावला. संशयिताविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१४ जुलै) रात्री शहरात नियमित गस्त सुरू असताना डीबी पथकाला गुप्त माहिती मिळाली की, दीपक चौपाटी परिसरातील जुनघरी कॉम्प्लेक्सजवळ एक संशयित इसम हातात लोखंडी सळई घेऊन फिरत आहे. ही माहिती मिळताच पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराला घेराव घातला.
हनुमान मंदिराच्या मागील बाजूस संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी पंचांसमक्ष ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव अनिल येलन्ना चिंचुलकर (वय ३०, रा. मुकुटबन, ता. झरी) असे सांगितले. रात्री उशिरा त्या ठिकाणी लोखंडी सळई घेऊन संशयास्पदरित्या फिरणाऱ्या त्या व्यक्तीकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत लोखंडी सळई जप्त केली.
या प्रकरणी संशयिताविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख सैय्यद साजिद व डीबी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल मोनेश्वर खंडरे, गजानन सावसाकडे, गणेश मेश्राम, रितेश भोयर आदींनी केली.

No comments: