Latest News

Latest News
Loading...

कायरमध्ये महावितरणचे स्थानिक कार्यालय सुरू करा; ग्रामपंचायतीची मागणी


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी तालुक्यातील कायरसह आसपासच्या गावांतील नागरिकांची वीजविषयक कामांसाठी होणारी गैरसोय लक्षात घेता कायर येथे महावितरणचे स्थानिक कार्यालय तातडीने सुरू करावे, अशी मागणी कायर ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरणच्या पांढरकवडा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

सध्या कायर व आसपासच्या गावांतील नागरिकांना वीज बिल भरणे, नवीन वीज जोडणी, मीटरसंदर्भातील कामे, वीजपुरवठ्याच्या तक्रारी तसेच महावितरणच्या विविध सेवांसाठी सुमारे १३ किलोमीटर अंतरावरील मुकुटबन येथील कार्यालयात जावे लागते. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अनेक गावांचा समावेश असल्याने तेथे दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, छोट्या कामासाठीही नागरिकांचा पूर्ण दिवस खर्ची पडत असल्याची वस्तुस्थिती निवेदनातून मांडण्यात आली आहे.

यामुळे शेतकरी, मजूर, विद्यार्थी, व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिकांना वेळेचा व आर्थिक खर्चाचा मोठा फटका बसत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. कायर हे परिसरातील प्रमुख गाव असल्याने आसपासच्या अनेक गावांतील नागरिकांची येथे नियमित ये-जा असते. त्यामुळे कायर येथे महावितरणचे स्थानिक कार्यालय सुरू झाल्यास हजारो नागरिकांना वीजविषयक सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील, तसेच मुकुटबन कार्यालयावरील वाढता ताणही कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे.

नागरिकांच्या दैनंदिन अडचणींचा विचार करून कायर येथे महावितरणचे स्थानिक कार्यालय मंजूर करून लवकरात लवकर कार्यान्वित करावे, अशी मागणी कायर ग्रामपंचायतीचे सरपंच नागेश धनकसार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. आता या मागणीवर महावितरण प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.